जागतिक ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनी २०३० पर्यंत भारतात अतिरिक्त ७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीला चालना देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यापूर्वीही अॅमेझॉनने भारतातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी सुमारे ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक निश्चित केली आहे. त्यामुळे नव्या घोषणेनंतर भारतातील कंपनीची एकूण नियोजित गुंतवणूक ११ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार आहे.
या गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून अॅमेझॉनने कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये चार नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांची घोषणा केली आहे. या प्रकल्पांची एकत्रित वीज निर्मिती क्षमता ९३४ मेगावॅट असणार आहे. यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे भारतातील अॅमेझॉनच्या अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीची भारतातील अक्षय ऊर्जा क्षमता २ गिगावॅटपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
डॉलरच्या तुलनेत रुपयाची दमदार उसळी
भारतीय स्टील निर्यातीला युरोपियन युनियनच्या अँटिडम्पिंग शुल्काचा फटका
चीनच्या एआय कंपनी झिपूच्या शेअरमध्ये ८५ टक्क्यांची घसरण
मायक्रोसॉफ्टनंतर अमेरिकेतील बँका आणि विमानसेवा विस्कळीत
अॅमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. देशात औद्योगिकीकरण, डिजिटल सेवा आणि डेटा सेंटरचा विस्तार वेगाने होत असताना विजेची मागणीही वाढत आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक कोळसा आणि इतर जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करून सौर आणि पवन ऊर्जेचा वापर वाढवणे महत्त्वाचे ठरत आहे. नव्या प्रकल्पांमुळे ऊर्जा निर्मितीबरोबरच संबंधित पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर जीवाश्म इंधनाधारित ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुसरीकडे, अॅमेझॉननेही २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यामुळे भारतातील ही गुंतवणूक कंपनीच्या जागतिक पर्यावरणपूरक धोरणाचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे. विशेष म्हणजे, भारतातील वाढत्या अक्षय ऊर्जा बाजारपेठेत जागतिक कंपन्यांना मोठ्या संधी दिसत असल्याचेही या निर्णयातून स्पष्ट होते.
