प्रभू राम हे केवळ धार्मिक व्यक्तिमत्त्व नसून नैतिकता, सौंदर्यशास्त्र आणि जीवनशैलीचे प्रतीक आहेत. धर्म कोणताही असला, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि रक्तात राम वास करतात, असे मत ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानावर ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी टीका केली आहे. अख्तर व्यावसायिक हित लक्षात घेऊन अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईत ‘इंडियाज म्युझिक क्रिएटर इकॉनॉमी’च्या शुभारंभ कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अख्तर यांनी राम यांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर भाष्य केले. “राम म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक कल्पना आहे. राम म्हणजे नीतिमत्ता, जगण्याची पद्धत आणि विशिष्ट सौंदर्यशास्त्र आहे. त्यामुळे राम यांच्याकडे या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांचे महत्त्व प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करते,” असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे काही लोक नाराज होऊ शकतात, याची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले.
अख्तर पुढे म्हणाले की, राम यांना केवळ मानवी रूपात पाहणे योग्य नाही. ते त्यापेक्षा खूप मोठे आहेत. राम ही एक जीवनशैली आहे. दरम्यान, त्यांना रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. मात्र, आपण अद्याप हा चित्रपट पाहिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मुलीने चित्रपट पाहिला असून तिला तो आवडल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
राहुल गांधी अमेरिकेत पुन्हा बरळले
मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले
जागतिक नेत्यांना मोदींकडून भारतीय कलांचा नजराणा
ठाणे पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअपवर टाकले अश्लिल व्हीडिओ
दरम्यान, अख्तर यांच्या वक्तव्यावर मौलाना साजिद रशीदी यांनी आक्षेप घेतला. बॉलिवूडमध्ये गाणी विकली जातात आणि अशी वक्तव्ये केली नाहीत, तर त्यांची गाणी कोण विकत घेईल, असा सवाल त्यांनी केला. अख्तर स्वतःला नास्तिक म्हणवतात, मग राम यांच्याविषयी एवढे सकारात्मक बोलण्यामागे काय कारण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रशीदी यांनी अख्तर यांना नाव बदलून ‘राम पाल’ ठेवण्याचा सल्लाही दिला. असे केल्यास देशातील ८० टक्के हिंदू लोकसंख्या त्यांना अधिक आदर देईल, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. आपण मुस्लिम असल्याचा अभिमान असून सभ्य जीवन जगत असल्याचे सांगत, अख्तर दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही रशीदी यांनी केली.
