अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडांचे सत्र सुरू असून, त्याचा फटका आता बँकिंग आणि विमान वाहतूक क्षेत्रालाही बसला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये व्यत्यय आल्यानंतर आता जेपी मॉर्गन चेससह अनेक बड्या बँकांच्या ऑनलाइन सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्याचवेळी युनायटेड एअरलाइन्सच्या संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्याने शेकडो विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. या घटनांमुळे अमेरिकेतील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक समस्येमुळे ग्राहकांना ऑनलाइन खात्यांमध्ये प्रवेश करणे, खात्यातील शिल्लक तपासणे आणि पैसे हस्तांतरित करणे यामध्ये अडचणी आल्या. जेपी मॉर्गन चेसच्या अंतर्गत हार्डवेअर प्रणालीतील सॉफ्टवेअर बिघाडामुळे इतर बँकांशी संबंधित व्यवहारही संथ झाले. डाउनडिटेक्टरच्या आकडेवारीनुसार, चेस बँकेच्या जवळपास पाच हजार ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्या, तर वेल्स फार्गोच्या आठशेहून अधिक ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागला. हा सायबर हल्ला नसून तांत्रिक त्रुटी असल्याचे बँकेने स्पष्ट केले.
हे ही वाचा:
देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ
न्यायिक अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल आमदाराला समन्स
‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला
ठार झालेला दहशतवादी दार याने केली होती रेकी
दरम्यान, युनायटेड एअरलाइन्सच्या वेब-आधारित संगणकीय प्रणालीतही बिघाड झाला. ही प्रणाली ९० मिनिटांहून अधिक काळ विस्कळीत राहिल्याने देशभरातील विमान वाहतुकीवर परिणाम झाला. फ्लाइटअवेअरच्या आकडेवारीनुसार, ८५१ विमानांना उड्डाणासाठी विलंब झाला, तर ५१ उड्डाणे रद्द करण्यात आली. प्रणाली बंद पडल्यामुळे विमानांचे अंतिम वजन आणि उड्डाणापूर्वी आवश्यक असलेली गणिते उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे विमान आणि कर्मचारी तयार असूनही उड्डाणे वेळेत सुरू करणे शक्य झाले नाही.
विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्टपासून बँकिंग आणि विमान वाहतुकीपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये तांत्रिक अडचणी समोर येत आहेत. या घटनांचा एकमेकांशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट झालेले नाही. मात्र, आधुनिक अर्थव्यवस्था डिजिटल प्रणालींवर किती अवलंबून आहे, हे या घटनांनी अधोरेखित केले आहे. तंत्रज्ञानामुळे कामकाज वेगवान झाले असले, तरी एका प्रणालीतील बिघाडामुळे हजारो ग्राहक आणि प्रवाशांना त्याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे डिजिटल सेवांसाठी सक्षम पर्यायी व्यवस्था आणि तांत्रिक बॅकअप उभारण्याची गरज पुन्हा चर्चेत आली आहे.
