घरविशेष'दृश्यम ३ : द कन्क्लुजन'च्या ओटीटी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

‘दृश्यम ३ : द कन्क्लुजन’च्या ओटीटी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम ३ : द कन्क्लुजन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासमोरील कायदेशीर अडथळा तूर्तास दूर झाला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन आणि ओटीटीवरील प्रसारण रोखण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला असून ओटीटी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकुमार थिएटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात ही याचिका दाखल केली होती. मात्र, चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे आणि कायदेशीर अधिकार याचिकाकर्त्यांना सिद्ध करता आले नाहीत.

या संपूर्ण वादाचे मूळ ‘दृश्यम’ चित्रपटाच्या हिंदी रिमेक अधिकारांमध्ये आहे. मूळ मल्याळम चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी २०१३ मध्ये वाइड अँगल क्रिएशन्सला हिंदी आणि उत्तर भारतीय भाषांमधील रिमेकचे विशेष अधिकार दिले होते. त्यानंतर २०१४ मध्ये वाइड अँगल क्रिएशन्स आणि राजकुमार थिएटर्स यांच्यात हिंदी रिमेकच्या व्यावसायिक विकास आणि वितरणासंदर्भात करार झाला. याच कराराच्या आधारे आगामी चित्रपटाच्या अधिकारांवर राजकुमार थिएटर्सने दावा केला होता. मात्र, निर्मात्यांनी हा दावा फेटाळून लावला.

हे ही वाचा:
डॉलरच्या तुलनेत रुपयाची दमदार उसळी

भारतीय स्टील निर्यातीला युरोपियन युनियनच्या अँटिडम्पिंग शुल्काचा फटका

चीनच्या एआय कंपनी झिपूच्या शेअरमध्ये ८५ टक्क्यांची घसरण

मायक्रोसॉफ्टनंतर अमेरिकेतील बँका आणि विमानसेवा विस्कळीत

यापूर्वीही राजकुमार थिएटर्सने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, १ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर कंपनीने पुन्हा दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. एकाच मुद्द्यावर आणि त्याच कागदपत्रांच्या आधारे वारंवार स्थगिती मागता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, चित्रपटामुळे त्यांच्या कॉपीराइटचे नेमके कसे उल्लंघन होत आहे, हेही याचिकाकर्त्यांना सिद्ध करता आले नाही.

न्यायमूर्ती पी. बी. बालाजी यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे अजय देवगण आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दृश्यम ३ : द कन्क्लुजन’च्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. मात्र, चित्रपटाच्या कॉपीराइटसंदर्भातील अंतिम वाद अद्याप निकाली निघालेला नाही. त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय निर्मात्यांसाठी दिलासादायक असला, तरी अंतिम कायदेशीर लढाई बाकी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version