बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या डिसेंबरमधील संभाव्य मायदेशी परतीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राजधानी ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन क्रूड बॉम्बस्फोट झाले. या घटनांमध्ये तीन पादचारी किरकोळ जखमी झाले आहेत. देशभरात आधीच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असताना हे स्फोट झाल्याने चिंता वाढली आहे.
विमानतळाच्या बाहेरील प्रवेशद्वाराजवळ पहिला स्फोट झाला, तर दुसरा विमानतळाजवळील जासिमुद्दीन परिसरात झाला. विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कमरुल इस्लाम तालुकदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी उड्डाणपुलावरून हे बॉम्ब फेकले. स्फोटांमध्ये तीन पादचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. घटनांनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या स्फोटांचा शेख हसीना यांच्या परतीशी संबंध आहे का याचा तपास केला जाणार आहे.
शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेवरून पायउतार झाल्या आणि भारतात आल्या. आता डिसेंबरमध्ये त्या बांगलादेशात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही दिवसांत देशात बस, रेल्वे आणि बँकांना लक्ष्य करून जाळपोळ तसेच हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अवामी लीगच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
संभाव्य घातपात रोखण्यासाठी ढाका, गोपालगंज आणि अन्य संवेदनशील जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा योजना आखण्यात आली आहे. गोपालगंजमध्ये सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून सीमा सुरक्षा दलाच्या दहा तुकड्याही तैनात आहेत. डिसेंबर महिन्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यासह गुप्तचर यंत्रणांची देखरेख वाढवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मनातून माफी नको, मनापासून माफी मागा!
चिन्मय कृष्ण दास यांचे अचानक ढाका तुरुंगात स्थलांतर
भारत आणखी एक हजार विमाने खरेदी करणार
मोदींचा फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख; ‘बारॉन्ग टागालॉग’ने वेधले लक्ष
दरम्यान, हसीना यांनी अलीकडेच नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी अर्ज केला आहे. बांगलादेशात त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रकरणे सुरू असून, भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य परतीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील सुरक्षा आणि राजकीय परिस्थितीकडे लक्ष लागले आहे.
