देशातील हवाई प्रवासाची वाढती मागणी आणि विमानांची तीव्र कमतरता लक्षात घेता भारत आणखी एक हजार नागरी प्रवासी विमाने खरेदी करण्यास तयार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. भारताने यापूर्वीच १,२०० हून अधिक विमानांची ऑर्डर दिली असून, देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन हजारांपेक्षा अधिक विमानांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर विमानांची लवकरात लवकर डिलिव्हरी मिळावी यासाठी आघाडीच्या विमान उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पीयूष गोयल हे सध्या दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर आहेत. सोमवारी कैरो येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारताच्या वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रातील गरजांवर भाष्य केले. भारताला आणखी एक हजार विमानांची गरज असून, एअरबस आणि बोईंग यांसारख्या प्रस्थापित विमान उत्पादकांकडून विमानांचा पुरवठा वेगाने व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत आणि इजिप्तदरम्यान हवाई संपर्क वाढवण्याची गरजही गोयल यांनी व्यक्त केली. अधिक विमाने उपलब्ध झाल्यानंतर या मार्गावरील विमानसेवा आणि फेऱ्यांची संख्या वाढवता येईल, असे ते म्हणाले. सध्या इजिप्तएअर भारत आणि इजिप्तदरम्यान थेट विमानसेवा चालवते. गोयल यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने आहे.
दरम्यान, भारतातील इंडिगो आणि एअर इंडिया या प्रमुख विमान कंपन्यांनी एअरबस आणि बोईंगकडे मोठ्या प्रमाणावर विमानांच्या ऑर्डर दिल्या आहेत. मात्र, विमानांच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा आणि डिलिव्हरीचे आव्हान कायम आहे. विमान उत्पादन क्षेत्रात भारताची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जात आहे. एअरबसने भारतात लष्करी वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी दोन अंतिम असेंब्ली लाईन्स सुरू केल्या आहेत. तसेच एअरबस आणि बोईंग या कंपन्या भारतीय कंपन्यांकडून दरवर्षी सुमारे दोन अब्ज डॉलर किमतीचे सुटे भाग आणि सेवा घेतात.
हे ही वाचा:
मोदींचा फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख; ‘बारॉन्ग टागालॉग’ने वेधले लक्ष
दहशतवादविरोधी कारवायांसाठी ‘फोर्स वन’ एटीएसच्या नियंत्रणाखाली
चीनचा हवाई वाहतुकीत नवा अध्याय! इलेक्ट्रिक विमान झेपावले
श्रीगंगानगर स्फोटप्रकरणी आणखी दोन बॉम्ब जप्त
याशिवाय, ब्राझीलची विमान उत्पादक कंपनी एम्ब्राएर आणि अदानी समूह यांनी भारतात प्रादेशिक विमानांच्या निर्मितीची शक्यता तपासण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे विमानांची खरेदी वाढवण्यासोबतच देशांतर्गत विमाननिर्मितीचे क्षेत्र विकसित करण्याचाही भारताचा प्रयत्न आहे.
