राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनूपगड-सूरतगड रेल्वेमार्गावरील स्फोटप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी दोन बॉम्ब जप्त केले आहेत. रामसिंहपूर रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या या बॉम्बपैकी एक सक्रिय अवस्थेत, तर दुसरा निकामी स्थितीत होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेली महकदीप कौर आणि देविंदर सिंह यांनी बॉम्ब लपविल्याची ठिकाणे पोलिसांना दाखवली. त्यानंतर दोन्ही बॉम्ब जप्त करण्यात आले. ३ नोव्हेंबर रोजी रेल्वेमार्गावर स्फोट झाला होता.
दरम्यान, दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात या कटामागे पाकिस्तानमधील हँडलर असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून प्रवासी रेल्वेगाडी उडवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, स्फोटकांच्या वेळेचे नियोजन चुकल्याने रेल्वेगाडी गेल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना टळली.
एटीएसच्या माहितीनुसार, पंजाबमधील गुरुदासपूर येथील घटस्फोटित महिला महकदीप कौर हिला पाकिस्तानी हँडलरने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांचे आमिष दाखवले. महकदीपनेही तिचा प्रियकर देविंदर सिंह याला पैसे आणि लग्नाचे आश्वासन देऊन कटात सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क नव्हता, तेव्हा अजितदादांचा फोन यायचा
घरबसल्या नोकरीच्या आमिषाने तरुणीला ९०.८ लाखांचा गंडा
आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल
कुलगाममध्ये लष्करच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा
महकदीपचा पूर्वाश्रमीचा पती करण याने तुरुंगात भेटीदरम्यान तिला ‘लव्हली’ नावाच्या पाकिस्तानस्थित तस्कराचा संपर्क क्रमांक दिला होता. हेरॉइन तस्करीप्रकरणी करणला फेब्रुवारी २०२५ मध्ये अटक झाली होती. ‘लव्हली’ने महकदीपची ‘शाह’ नावाच्या साथीदाराशी ओळख करून दिली. त्याने प्रेमसंबंध निर्माण करून तिला स्फोट घडवण्यासाठी तयार केल्याचा एटीएसचा दावा आहे. पाकिस्तानी हँडलरने व्हिडिओ कॉलद्वारे महकदीप आणि देविंदर यांची पाकिस्तानमधील साथीदाराशी ओळख करून दिली. त्याने दोघांना आयईडी लावण्याची जबाबदारी दिली होती. तसेच, टाइम बॉम्ब तयार करण्याच्या आणि तो कार्यान्वित करण्याच्या सूचनाही व्हिडिओ कॉलद्वारे दिल्याचे तपासात समोर आले आहे.
