घरबसल्या डेटा एंट्रीचे काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याच्या आमिषाने भांडुपमधील ३१ वर्षीय तरुणीची तब्बल ९०.८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर भामट्यांनी नोकरीच्या नावाखाली विविध शुल्कांची मागणी करत तिच्याकडून २०२३ ते २०२६ या तीन वर्षांत ५२५ वेळा यूपीआयद्वारे पैसे उकळले. विशेष म्हणजे, स्वतःची बचत संपल्यानंतर तिने वडिलांच्या निवृत्तिवेतनाची रक्कमही या भामट्यांना पाठवली.
ही तरुणी ठाण्यातील एका कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित आयटी कंपनीत काम करते. २८ सप्टेंबर २०२३ रोजी तिने इन्स्टाग्रामवर डेटा एंट्रीच्या घरून काम करण्याच्या जाहिरातीला प्रतिसाद दिला. त्यानंतर संबंधितांनी तिच्याकडून कागदपत्रे आणि छायाचित्रे घेतली. नोकरीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नोंदणी शुल्क, फॉर्म, जीएसटी, सीजीएसटी आणि कंपनीच्या धोरणानुसार विविध शुल्क भरण्यास सांगितले. अशा प्रकारे तिच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ५२५ व्यवहारांतून ९०.८ लाख रुपये जमा करून घेण्यात आले.
फोटो मॉर्फ करून बदनामीची धमकी
तिने पैसे देणे थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना खोट्या पोलीस तक्रारी दाखल करून अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच तिच्या छायाचित्रांचा वापर करून आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो तयार केले असून ते सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकीही दिली. व्हॉट्सअपवर खुशबू खान, नसरत अंजुम आणि वसीम खान अशी नावे वापरणाऱ्या व्यक्ती या व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हे ही वाचा:
आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल
कुलगाममध्ये लष्करच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा
बिल्किस बानो प्रकरणातील दोन दोषींच्या जन्मठेपेला स्थगिती; जामीन मंजूर
जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूलचा नेता अटकेत
या प्रकरणी पूर्व विभागीय सायबर पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर चार वेळा ऑनलाइन तक्रारीही केल्या होत्या. पोलिसांनी पैसे जमा झालेल्या बँक खात्यांवर निर्बंध घालण्यासाठी संबंधित बँकांना कळवले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
