भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर २०२० मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी युवा नेता इम्रान हसन मोल्ला याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याला पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील उस्ती परिसरात नेले. या वेळी तो स्थानिकांसमोर हात जोडून माफी मागताना आणि मान खाली घालून चालताना दिसल्याचे वृत्त आहे.
मोल्लाला ४ आणि ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री देउला परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. तो मगऱ्हाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील तृणमूल युवा काँग्रेसचा माजी पदाधिकारी असून, डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा निकटवर्तीय असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी त्याला नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या ठिकाणी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०२१ आणि २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना धमकावणे, भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करणे आणि भाजपशी संबंधित व्यक्तींच्या घरांची तोडफोड करणे, असे आरोपही मोल्लावर आहेत.
हे ही वाचा:
भारत- इजिप्तमध्ये वाहतूक, पुरवठा, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात संधी
‘ऑपरेशन सिंदूर’मधून स्वदेशी शस्त्रांची ताकद सिद्ध!
२०२७मध्ये भारताचा विकासदर चीनपेक्षा वरचढ
झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांनो सावधान!
१० डिसेंबर २०२० रोजी नड्डा हे २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी डायमंड हार्बर येथे जात असताना शिराकोल परिसरात त्यांच्या ताफ्यावर दगड, विटा आणि बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. या ताफ्यात भाजप नेते कैलास विजयवर्गीय आणि दिलीप घोषही होते. विजयवर्गीय यांच्या वाहनाचे नुकसान झाले होते. या प्रकरणात मोल्ला हा सातवा आरोपी असून, यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
