भारताचा आर्थिक विकासदर २०२७ मध्ये ७.२ टक्के राहण्याचा अंदाज असून, याच काळात चीनचा विकासदर ४.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत अधिक वेगाने वाढेल, असा अंदाज जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारताचा विकासदर ७.९ टक्के, तर चीनचा विकासदर ४.४ टक्के राहू शकतो. दुसरीकडे, अमेरिकेचा विकासदर २०२७ मध्ये २.४ टक्के आणि २०२६ मध्ये २.३ टक्के राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गोल्डमन सॅक्सच्या अहवालातील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील जागतिक गुंतवणुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये एआयवरील जागतिक खर्च सुमारे १.१ ट्रिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे. २०२७ मध्ये हा खर्च वाढून १.८ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
अमेरिकेत हार्डवेअर क्षेत्रातील गुंतवणुकीत सुमारे ५०० अब्ज डॉलरची वाढ होणार असल्याने एआयवरील खर्चात मोठी वाढ अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुढील वर्षी जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीत एआय क्षेत्रातील गुंतवणुकीचा वाटा ०.४ टक्के इतका राहण्याचा अंदाज आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक आणि त्याच्याशी संबंधित बौद्धिक संपदा निर्यातीची सांख्यिकीय मोजणी कमी झाल्याचा परिणाम विचारात घेतल्यानंतर, अमेरिकेच्या जीडीपी वाढीत एआय गुंतवणुकीचा वाटा ०.६ टक्के राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
सीएसएमटी स्थानकाला बॉम्बने उडविण्याची धमकी
मराठवाड्याचं करायचं काय, करावा कोणता उपाय?
उत्तराखंडमध्ये काँग्रेस आमदाराने माईक फेकला, खुर्चीने केली मारहाण
अंतराळातून परतणाऱ्या स्टारशिपला स्पेसएक्सने हवेतच पकडले
जागतिक गुंतवणूक बँकेने २०२७ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था सुमारे २.८ टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२६ मध्ये हा दर सुमारे २.७ टक्के राहण्याची शक्यता आहे. ऊर्जा किमतींमध्ये होणारी घट आणि एआय क्षेत्रातील गुंतवणुकीचा सुरू असलेला ओघ ही जागतिक आर्थिक वाढीमागील प्रमुख कारणे असतील, असे अहवालात म्हटले आहे.
गोल्डमन सॅक्स रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि प्रमुख जान हॅट्झियस यांनी सांगितले की, हा आर्थिक अंदाज जागतिक आर्थिक घडामोडींना आकार देणाऱ्या घटकांमधील बदल दर्शवतो. यामध्ये ऊर्जा खर्च, तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक आणि वित्तीय धोरणांचा महत्त्वाचा समावेश आहे.
“२०२७ मध्ये जीडीपीची वाढ ठोस राहील, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, या वाढीमध्ये कोणतीही विशेष वेगवान तेजी दिसून येणार नाही,” असे हॅट्झियस यांनी स्पष्ट केले.
