घरबिजनेसमायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस ठप्प झाल्याने ग्राहकांना भरपाईची संधी

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस ठप्प झाल्याने ग्राहकांना भरपाईची संधी

३१ डिसेंबरपर्यंत करावा लागणार क्लेम

मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल सेवांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील व्यावसायिक ग्राहकांना मोठा फटका बसला. Outlook, Exchange Online आणि Microsoft Teams यांसारख्या महत्त्वाच्या सेवा तब्बल ३६ तासांहून अधिक काळ विस्कळीत झाल्याने ई-मेल व्यवहार, ऑनलाइन बैठका आणि कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर प्रभावित व्यावसायिक ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सेवा करारानुसार पात्र ग्राहकांना भविष्यातील सबस्क्रिप्शन बिलामध्ये सवलत अर्थात सर्व्हिस क्रेडिट मिळू शकते.

मायक्रोसॉफ्टच्या Service Level Agreement (SLA) नुसार कंपनीकडून दर महिन्याला ९९.९ टक्के सेवा उपलब्धतेची हमी दिली जाते. ही हमी पूर्ण न झाल्यास पात्र ग्राहक भरपाईसाठी दावा करू शकतात. सेवा बंद राहण्याचा कालावधी आणि त्याचा झालेला परिणाम लक्षात घेऊन २५, ५० किंवा १०० टक्क्यांपर्यंत सर्व्हिस क्रेडिट मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार नाही, तर भविष्यातील सबस्क्रिप्शन बिलामध्ये सवलत म्हणून दिली जाईल. Microsoft 365 Personal आणि Family प्लॅनधारकांना या व्यावसायिक भरपाईचा लाभ मिळणार नाही.

भरपाईसाठी ग्राहकांना Microsoft 365 Admin Centre मध्ये लॉगिन करून Billing आणि Help & Support विभागातून तक्रार नोंदवावी लागेल. सेवा बंद राहिल्याचा कालावधी, प्रभावित सेवा, वापरकर्त्यांची संख्या आणि संबंधित तांत्रिक बिघाडाचा Incident ID यांची माहिती द्यावी लागेल. Outlook साठी MO1550821, Exchange साठी EX1550543 आणि Teams साठी TM1550488 हे संदर्भ क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. तक्रारीची पडताळणी केल्यानंतरच भरपाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

ज्या कंपन्यांनी मायक्रोसॉफ्टच्या सेवा अधिकृत विक्रेत्यांमार्फत घेतल्या आहेत, त्यांनी संबंधित सेवा पुरवठादाराशी संपर्क साधणे आवश्यक आहे. अशा ग्राहकांच्या वतीने विक्रेता भरपाईचा दावा दाखल करू शकतो. या तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित झालेल्या पात्र व्यावसायिक ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत दावा दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे तयार ठेवून वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version