भारतात कोणाची सत्ता राहावी आणि कोणाची राहू नये, याचा निर्णय यापुढे इटली आणि नॉर्वेमधील धंदेवाईक चळवळीतील लोकांनी करावा, अशा प्रयत्नात काँग्रेस पक्ष आहे. याचे कारण स्पष्ट आहे; मुस्लिम मतदार सोडला तर काँग्रेस पक्षाकडे देशात फारसे समर्थन उरलेले नाही आणि जनताही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता विदेशी हातांवरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत समिट’मध्ये हा सगळा गोतावळा गोळा करण्यात आला होता. जियाकोमा फिलिबेक या इटालियन राजकीय नेत्याला याच उद्देशाने ‘भारत समिट २०२६’ मध्ये बोलावण्यात आले होते. हा इटालियन नेता मोदींच्या विरोधात बरळला, कारण त्याचे मूळ भारतात नसून इटलीच्या राजकारणात आहे.
इटलीतील एक गोरा माणूस भारतात येतो आणि हैदराबादच्या भारत समिटमध्ये “वोट चोर, गद्दी छोड” अशी घोषणा देतो. हा नेता राहुल गांधी यांच्या आजोळचा असल्यामुळे काँग्रेसची पाठराखण करण्यासाठी भारतात आला होता का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल; परंतु हे खरे नाही. याचे खरे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या आहेत. मेलोनी आणि मोदी यांच्यात अत्यंत विश्वासाचे संबंध असल्यामुळे फिलिबेकने ‘वड्याचे तेल वांग्यावर काढले’ एवढेच! इटलीच्या ‘डेमोक्रॅटिक पार्टी’चा हा नेता असून युरोपियन स्तरावर काम करणाऱ्या ‘पार्टी ऑफ युरोपियन सोशालिस्ट’ या संघटनेची ही शाखा आहे. हे सगळे नेते कट्टर डाव्या-समाजवादी विचारसरणीचे आहेत. उजव्या आणि राष्ट्रवादी विचारसरणीबद्दल त्यांच्या मनात पराकोटीचा द्वेष आहे. २०१४ मध्ये जेव्हा इटलीच्या डेमोक्रॅटिक पार्टीने ‘पार्टी ऑफ युरोपियन सोशालिस्ट’चे पूर्णवेळ सदस्यत्व स्वीकारले, तेव्हापासून जियाकोमा फिलिबेक हे इटालियन राजकारणी डाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि सध्या ते याच संघटनेचे सरचिटणीस आहेत.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या उजव्या विचारसरणीच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आहेत, तर फिलिबेक हे समाजवादी आणि मध्यममार्गी-डाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. मेलोनी या मोदींच्या मोठ्या प्रशंसक आहेत, त्यामुळे डाव्या विचारांचे फिलिबेक हे राहुल गांधींचे चाहते बनले आहेत. जसा राहुल गांधींना बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दल कळवळा आहे, तसाच फिलिबेक यांना स्थलांतरितांबद्दल कळवळा आहे. ज्या स्थलांतरितांनी अलीकडेच फ्रान्स आणि इटलीत हिंसाचार घडवला, त्यांचे दोन्ही हात पसरून स्वागत करा, असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांचा एक वर्ग युरोपात आहे; फिलिबेक हे त्याच वर्गातील आहेत.
हे ही वाचा:
अर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली
पंतप्रधान मोदींनी आदिवासी क्रांतिकारकांना पुन्हा सन्मान प्राप्त करून दिला!
‘एक्स मुस्लिम’ साहिल यांच्यावर नवी मुंबईत जीवघेणा हल्ला
राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘परकीय हात’
अर्थात, ‘शत्रूचा शत्रू हा मित्र’ हेच समीकरण फिलिबेक आणि राहुल गांधी यांच्या युतीमागे आहे. मोदींचे जुने विरोधक एक तर थंडावले आहेत किंवा ते आता मोदींकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा हे याचे ताजे उदाहरण आहे. पित्रोदा हे गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांना नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या—बहुधा आयुष्यात पहिल्यांदाच! या शुभेच्छा कोरड्या नव्हत्या, कारण त्यात ‘सॅम भाई – अंजली बेन’ अशा शब्दांची आपुलकीने पेरणी करण्यात आली होती. पित्रोदांनी केवळ त्या शुभेच्छांचा स्वीकार केला नाही, तर उत्तरादाखल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी मोदींचा उल्लेख ‘गुजराती मित्र’ असा केला. सोनिया गांधी यांचे एकंदर कडक राजकारण पाहिले तर हा दिवाळी संवाद ते फार सहजासहजी स्वीकारतील असे नाही. हे माहीत असूनही पित्रोदांनी सोशल मीडियावर ही जाहीर गळाभेट घेतली, हे विशेष आहे.
सोनिया गांधींचे निकटवर्तीय, विश्वासू आणि सर्व गुपिते माहीत असलेले सॅम पित्रोदा यांच्यासारखे नेते जर मोदींबाबतचा कडवटपणा बाजूला ठेवताना दिसत असतील, तर कर्नाटक मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासोबतही मोदी अत्यंत आत्मीयतेने वागले आणि शिवकुमार यांनीही त्याला तितकाच चांगला प्रतिसाद दिला. काँग्रेसचा मोदींशी उभा दावा असताना त्यांचे नेते जर मोदींशी इतक्या आपुलकीने वागत असतील, तर राहुल गांधींना नवे मोदी-विरोधक उभे करणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच त्यांच्यावर परदेशातून मोदी-विरोधकांना भारतात आयात करण्याची वेळ आली आहे.
परदेशातून मोदी-विरोधकांना बोलावून देशात तमाशा करण्याचा राहुल गांधींचा हेतू लक्षात आल्यामुळे, भारत-विरोधी प्रतिमा असलेल्या सुमारे ११५ जणांचे व्हिसा केंद्र सरकारतर्फे रद्द करण्यात आले. त्यात नॉर्वेची आगाऊ पत्रकार हेले लिंग स्वेंडसेन हिचे नाव समाविष्ट आहे. तिचे नाव या यादीतून वगळण्यात आल्यानंतर तिने सोशल मीडियावर मोठा रोष व्यक्त केला. त्यानंतर एका मुलाखतीत तिने भारतात ‘रिजीम चेंज’ (सत्ता बदल) हवा असल्याचे सूचक संकेत दिले. पत्रकार बातम्या करतात, त्यांचे विश्लेषण करतात; पण दुसऱ्या देशातील सरकार राहावे की जावे, यामध्ये ढवळाढवळ करणारे पत्रकार कसे असू शकतात? ते तर चळवळे आहेत.
जॉर्ज सोरोस यांसारखी मंडळी अशा लोकांना पोसण्यासाठी बसलीच आहेत. अशी ही हौशी मंडळी राहुल गांधींनी ‘भारत समिट’मध्ये जमा केली होती. याला ‘भारत समिट’ का म्हणावे? यात भारताच्या भल्याचा कोणता विचार मांडण्यात आला? उलट, ‘भारतातील लोकशाही संपली,’ असा डांगोरा पिटण्याचे काम याद्वारे राहुल गांधींनी करून घेतले. त्यामुळे या परिषदेला ‘भारत समिट’ ऐवजी ‘रिजीम चेंज समिट’ म्हणणे अधिक उचित ठरले असते. देशातील जनता त्यांना फार गंभीरपणे घेत नाही, किमान या विदेशी मंडळींनी तरी आपल्याला देशाचे पंतप्रधान घोषित करावे, एवढाच यामागचा उद्देश असावा.
परराष्ट्र मंत्रालयाने यावर अत्यंत स्पष्ट आणि बेधडक भूमिका घेतली असून, व्हिसा देणे किंवा नाकारणे हा कोणत्याही देशाचा सार्वभौम अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी भारत समिटमध्ये काहीतरी वेगळे बोलतील, अशी अपेक्षाच नव्हती. त्यांनी फक्त बाहेरून एक वेगळाच प्रेक्षकवर्ग गोळा केला होता. काँग्रेस सत्तेवर नसणे म्हणजेच भारतातील लोकशाही धोक्यात असणे, ही राहुल गांधी यांची लोकशाहीची साधी सरळ व्याख्या आहे. “भारत आता खऱ्या अर्थाने लोकशाही राहिलेला नाही. २०१४ मध्ये लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यात आली. पैशाचा आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. देशाचे राजकारणच बदलले आणि दशकभरानंतरही विरोधक या धक्क्यातून सावरलेले नाहीत,” असे ते म्हणतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबतच राहुल गांधींना आक्षेप आहे, असे कालपर्यंत वाटत होते; परंतु त्यांची ही समस्या मोदींच्या पहिल्या विजयापासूनच सुरू झाली आहे, हे त्यांच्या या विधानावरून लक्षात येते. ते अजूनही त्या धक्क्यातच आहेत, हे त्यांनी स्वतःच मान्य केले आहे.
राहुल गांधी अजूनही धक्क्यात आहेत आणि देशातील तमाम विरोधक जरी धक्क्यात असले, तरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा मात्र घाबरलेले आहेत—हा राहुल गांधींच्यापुढील विधानाचा अर्थ निघतो! एका वाक्यात ते म्हणतात, “आणि हे तुम्हाला आमच्या रस्त्यांवर दिसेल, दिल्लीत दिसेल आणि पंतप्रधान व अमित शहा यांच्या मनातील भीतीमध्ये स्पष्टपणे दिसून येईल की, आम्ही नरेंद्र मोदींचा पराभव करणारच आहोत.” जो माणूस स्वतःच धक्क्यात आहे, तोच ज्याने धक्का दिला त्याचा पराभव करू, असे म्हणत आहे. राहुल गांधी यांच्या एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी कधीच मेळ नसतो, त्यामुळे हे आयात केलेले पाहुणेही नक्कीच चक्रावले असणार.
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केलेले १४ कोटी लोक—म्हणजेच मतदारसंख्येच्या सुमारे १३ टक्के लोकांना—एकतर अस्तित्वात नसलेले मतदार किंवा अमतदार म्हणून घोषित करण्यात आले. जर निवडणूक आयोगाने १४ कोटी मतदारांना अवैध घोषित केले असेल, तर ती निवडणूक वैध कशी असू शकते?” असा सवाल राहुल गांधी विचारत आहेत. याचा अर्थ, राहुल गांधींचा यापुढील लढा हा मृत मतदारांसाठी किंवा दोन ठिकाणी मतदान करणाऱ्यांसाठी असेल, हे त्यांनी यातून स्पष्ट केले आहे.
हीच ‘वोट चोरी’ आहे, हे त्यांनी फिलिबॅकसारख्या भुरट्या नेत्यांच्या गळी उतरवले. ते भारतात येऊन मोदींच्या विरोधात घोषणा देतात. एकेकाळी भारतीयांनी ज्यांना देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान केले, त्या मोदींना ‘खुर्ची सोडा’ अशी घोषणा पूर्वी इटालियन वंशाच्या सोनिया गांधी आणि त्यांचेपुत्र देत असत; आता तीच घोषणा फिलिबॅकसारखा उपरा इटालियन नेता देत आहे आणि काँग्रेस त्यावर टाळ्या पिटत आहे. हे त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचेच लक्षण आहे. यावरून काँग्रेस ही आता मुस्लिम लीगपेक्षाही जास्त धोकादायक बनली आहे, असे म्हणावे लागेल.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
