घरस्पोर्ट्सअर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली

अर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली

न्यूझीलंडवर भारताची २२ धावांनी मात

गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४८.१ षटकांत १८७ धावांवर बाद झाला. या विजयासह भारतीय संघाने ही मालिका ३-१ अशी जिंकली.

२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. टिम सीफर्ट अवघ्या १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करणारा विल यंगही ४२ चेंडूंमध्ये २२ धावा करून माघारी परतला. निक केलीला २४ धावांवर अर्शदीप सिंहने त्रिफळाचीत केले. डीन फॉक्सक्रॉफ्टलाही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. तो ४२ चेंडूंमध्ये ३१ धावा करून बाद झाला.

एका टप्प्यावर न्यूझीलंडची धावसंख्या ८२ धावांवर ३ बाद अशी होती. संघ चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत होते. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने बळी मिळवत न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

फिन ॲलनला मोहम्मद सिराजने अवघ्या १ धावेवर माघारी धाडले. मायकेल ब्रेसवेल १९ धावा करून आकिब नबीच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार मिचेल सँटनरने क्रिस्टियन क्लार्कच्या साथीने सातव्या गड्यासाठी ३९ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नमन धीरने सँटनरला २४ धावांवर बाद करत ही भागीदारी मोडली.

क्रिस्टियन क्लार्क १६ धावा करून बाद झाला. ब्लेअर टिकनरने १४ धावा केल्या, तर जेकब डफीला केवळ ९ धावाच करता आल्या. भारताकडून अर्शदीप सिंहने उत्कृष्ट गोलंदाजी करत १० षटकांत ३० धावा देत ३ बळी मिळवले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आकिब नबी, यश ठाकूर आणि नमन धीर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

हे ही वाचा:

राजस्थान रेल्वे ट्रॅक स्फोटप्रकरणी पाक कनेक्शन उघड!

लक्ष्य सेनने जिंकला कुमामोटो मास्टर्सचा किताब

राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘परकीय हात’

अमेरिकेत डिझेलच्या दरात मोठी घसरण

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ४२.१ षटकांत २०९ धावांवर आटोपला. भारताची सुरुवातही निराशाजनक झाली. रोहित शर्मा अवघ्या ७ धावा करून बाद झाला, तर विराट कोहलीला केवळ ५ धावाच करता आल्या. ऋतुराज गायकवाड १८ धावा करून जेकब डफीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

कर्णधार श्रेयस अय्यरने २२ धावा केल्या. अवघ्या ३४ धावांवर ३ बळी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीत अक्षर पटेल आणि ईशान किशन यांनी डावाला आधार दिला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अक्षर पटेल ५५ चेंडूंमध्ये ४६ धावा करून बाद झाला. तर ईशान किशनने ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली.

आकिब नबी (५ धावा) आणि यश ठाकूर (०) यांना मिचेल सँटनरने बाद केले. अखेरच्या षटकांमध्ये मोहम्मद सिराज ११ धावा करून नाबाद राहिला. अर्शदीप सिंहने अवघ्या ४ चेंडूंमध्ये १४ धावांची तडाखेबंद खेळी करत भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली.

न्यूझीलंडकडून जेकब डफीने ३ बळी मिळवले. कर्णधार मिचेल सँटनरनेही ४७ धावा देत ३ बळी घेतले, तर मॅथ्यू फिशरने २ बळी मिळवले. अखेर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव १८७ धावांत गुंडाळत २२ धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version