भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमामोटो मास्टर्स स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्यने जपानच्या कोकी वातानाबे याचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
एक तास चार मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात लक्ष्यने स्थानिक खेळाडू आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या वातानाबेचा १३-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव केला.
२०२३ मध्ये सुरू झालेल्या कुमामोटो मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा लक्ष्य हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला होता.
हे ही वाचा:
शाकाहारी थाळी १२ टक्क्यांनी महागली
मोदींनी काँग्रेसजनांना असे केले ‘टॅप’ |
कोकणातल्या तीन सुवर्णकिनाऱ्यांवर ‘निळा झेंडा’ |
नवा प्रवास सुरू सेनाभवन ते टिळकभवन |
अंतिम सामन्यात वातानाबेने आक्रमक सुरुवात करत पहिला गेम २१-१३ असा जिंकला. मात्र, लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. त्याने १३-१० अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर सलग सहा गुण मिळवत नऊ गुणांची आघाडी निर्माण केली. मात्र, वातानाबेनेही सलग सात गुण मिळवत सामना पुन्हा रंगतदार केला आणि गुणफलक १९-१७ असा केला.
अशा दबावाच्या परिस्थितीतही लक्ष्यने संयम राखत दुसरा गेम २१-१८ असा जिंकला आणि सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, ५-५ अशी बरोबरी झाल्यानंतर लक्ष्यने हळूहळू आघाडी वाढवण्यास सुरुवात केली. मध्यंतरापर्यंत त्याने ११-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतरही आपली पकड कायम ठेवत २१-१४ असा गेम जिंकून ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या वर्षातील लक्ष्यचे हे तिसरे बीडब्ल्यूएफ टूर अंतिम सामने होते. या विजेतेपदामुळे त्याला ९,२०० जागतिक क्रमवारी गुण मिळाले असून, हंगामाच्या अखेरीस होणाऱ्या स्पर्धांसाठी त्याला मोठा फायदा होणार आहे.
