उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतराळात प्रवास करून पृथ्वीवर परतणाऱ्या ‘स्टारशिप’ अंतराळयानाला स्पेसएक्सने चक्क हवेतच पकडले आहे. टेक्सासमधील स्टारबेस येथील प्रक्षेपण केंद्रावर उभारण्यात आलेल्या विशाल टॉवरच्या दोन महाकाय यांत्रिक हातांनी या अंतराळयानाला अलगद पकडले. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जगभरातील अंतराळप्रेमी आणि वैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले आहे. अंतराळातून परतणाऱ्या स्टारशिपच्या वरच्या टप्प्याला अशा प्रकारे हवेत पकडण्याची ही पहिलीच यशस्वी कामगिरी ठरली आहे.
स्पेसएक्सने १३ नोव्हेंबर रोजी स्टारशिपची १५ वी चाचणी मोहीम प्रक्षेपित केली होती. या मोहिमेदरम्यान स्टारशिपने सुपर हेवी बूस्टरपासून यशस्वीरीत्या वेगळे होत अंतराळात प्रवेश केला. त्यानंतर २६ स्टारलिंक उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. अंतराळातील प्रवास पूर्ण केल्यानंतर १४ नोव्हेंबरला स्टारशिप पृथ्वीवर परतले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना प्रचंड उष्णतेचा सामना करून या अंतराळयानाने नियंत्रित पद्धतीने वेग कमी केला. त्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करून ते प्रक्षेपण टॉवरच्या दिशेने झेपावले. काही क्षणांतच टॉवरच्या यांत्रिक हातांनी त्याला अचूकपणे पकडले.
हे ही वाचा:
‘एक्स मुस्लिम’ साहिल यांच्यावर नवी मुंबईत जीवघेणा हल्ला
रेस्टॉरंटशिवाय उभा राहतोय कोट्यवधींचा फूड बिझनेस
उत्तराखंडमध्ये काँग्रेस आमदाराने माईक फेकला, खुर्चीने केली मारहाण
होर्मुझच्या सामुद्रधुनीत भीषण स्फोटामुळे तीन तेलवाहू जहाजांना आग
मात्र, या मोहिमेत स्पेसएक्सला दोन्ही टप्पे सुरक्षितपणे परत मिळवण्यात यश आले नाही. स्टारशिपला यशस्वीरीत्या पकडण्यात आले असले, तरी पहिल्या टप्प्यातील सुपर हेवी बूस्टरला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तांत्रिक अडचणींमुळे हा बूस्टर मेक्सिकोच्या आखातात उतरवण्यात आला. यापूर्वी स्पेसएक्सने सुपर हेवी बूस्टरला यशस्वीरीत्या पकडण्याचे प्रयोग केले होते. मात्र, अंतराळातून परतणाऱ्या स्टारशिपला पकडणे हे कंपनीसाठी मोठे आव्हान होते.
रॉकेटचे दोन्ही टप्पे पुन्हा वापरण्यायोग्य बनवणे हे एलॉन मस्क यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रत्येक अंतराळ मोहिमेनंतर रॉकेट नष्ट करण्याऐवजी त्याचा पुन्हा वापर करता आल्यास प्रक्षेपणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. भविष्यात चंद्र आणि मंगळावर मानवी मोहिमा राबवण्यासाठीही हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे स्टारशिपला हवेत पकडण्याची ही कामगिरी केवळ तांत्रिक यश नसून अंतराळ प्रवासाच्या भविष्यातील नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.
