मुंबईत शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी माजी मुस्लिम कार्यकर्ते आणि यूट्यूबर निसार अहमद शेख उर्फ ‘एक्स-मुस्लिम साहिल’ यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, वाशी परिसरात काही जणांच्या जमावाने साहिल यांना अडवून बोथट वस्तूंनी मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
या हल्ल्यात साहिल यांच्या डोक्याला आणि हातांना दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
साहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ते आपल्या मित्रांसोबत वाशी परिसरात बाहेर गेले होते. त्यावेळी मुंबईतील धारावी परिसरातून आलेल्या १३ ते १५ जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. इस्लाममधील कथित चुकीच्या प्रथा आणि धार्मिक कट्टरतेवर आपण टीका करत असल्यामुळे आपल्याला ठार मारण्याचा हल्लेखोरांचा उद्देश होता, असा आरोप त्यांनी केला. हल्ल्याच्या वेळी आपण नि:शस्त्र आणि असहाय्य असल्याचेही त्यांनी सांगितले. जमावातील रेहान नावाच्या एका व्यक्तीला आपण ओळखत असल्याचा दावा साहिल यांनी केला आहे.
आपल्याला लक्ष्य करून हल्ला करण्यात आल्याचा दावा करत साहिल यांनी हल्लेखोरांना तुरुंगात पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, माजी मुस्लिम सलीम यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दाखला देत माजी मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी सरकारने स्वतंत्र संरक्षण कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘परकीय हात’
शेपटीचा वार, पाकिस्तान गार; भारताचा आशियात जयजयकार!
इराणमध्ये अडकलेल्या भारतीय खलाशाच्या मायदेशी परतीचा मार्ग मोकळा
राहुल गांधींचे पूर्वज कोण, गंगाधर की गियासुद्दीन?
२०१८ मध्ये इस्लाम धर्माचा त्याग केल्याचे जाहीर केल्यानंतर साहिल यांना सातत्याने धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. धार्मिक मौलवींसोबत थेट चर्चासत्रे, वादविवाद आणि इस्लाममधील धार्मिक ग्रंथांवरील टीका यामुळे ते चर्चेत आले. त्यांचा मुख्य यूट्यूब चॅनेल २०२३ मध्ये बंद होण्यापूर्वी त्यांचे पाच लाखांहून अधिक सदस्य होते.
या घटनेनंतर भारतातील माजी मुस्लिमांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धर्मत्याग केल्यानंतर काही माजी मुस्लिमांना सामाजिक दबाव आणि हिंसक धमक्यांना सामोरे जावे लागत असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
