घरसंपादकीयराहुल गांधींचे पूर्वज कोण, गंगाधर की गियासुद्दीन?

राहुल गांधींचे पूर्वज कोण, गंगाधर की गियासुद्दीन?

देशावर ज्या नेहरू-गांधी घराण्याने काही दशके सत्ता राबवली, त्यांच्या मुघल आणि ब्रिटिश कनेक्शनबाबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यामुळे नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ‘टुवर्ड फ्रीडम’ या आत्मचरित्रात आपले आजोबा मुघलांचे दिल्लीतील अखेरचे कोतवाल होते, असा दावा जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्रात आहे. दिल्लीत गंगाधर नेहरू नावाचा कोणताही हिंदू कोतवाल नव्हता, मुघलांच्या अखेरच्या कोतवालाचे नाव गियासुद्दीन गाझी असे होते, असे या दाव्याचे खंडन अनेकांनी केले आहे. नेहरू जे म्हणाले तेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘बिलाँगिंग’ या आत्मचरित्रातून मांडले आहे. त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यावर दगड पडलेला आहे.

काँग्रेसचे मुघलांवर प्रेम नवे नाही. त्याच प्रेमापोटी नेहरू, इंदिरा गांधी आदींनी दिल्लीत बाबरापासून अकबरापर्यंत अनेकांच्या नावाने रस्त्यांचे नामकरण करण्यात आले. शालेय अभ्यासक्रमात चोला, गुप्त अशा महत्त्वाच्या राजवंशांना बाजूला ठेवून जेमतेम २०० वर्षांचा सत्ताकाळ असलेल्या मुघलांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. नेहरूंनी सोमनाथच्या पुनर्निर्माणाला विरोध केला, सोनिया गांधी-राहुल गांधी यांनी राम मंदिराला विरोध केला. ही परंपरा पाहून अनेकांच्या मनात शंका निर्माण होते की हे खरोखरच हिंदू आहेत काय?

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधी या सगळ्यांचे मुस्लिम धार्जिणे राजकारण, हिंदू विरोध, सनातन धर्माचा असलेला वावडे, या सर्वांनी अफगाणिस्तानातील बाबराला दिलेली भेट, यामुळे हे बाबराचे वंशज तर नाहीत ना, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. हा कुणाला काय वाटते आणि कोण काय म्हणतो याचा इतिहासाशी संबंध नसतो. जुने शिलालेख, दस्तावेज, कागदपत्रे हाच इतिहासाचा स्त्रोत असतो. याचा आधार घेऊन पाहिले तर आपल्या लक्षात येईल, कौल-नेहरू घराणे हे इतिहास काळापासून मुघल आणि ब्रिटिशांच्या सेवेत होते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने त्यांची भूमिका ब्रिटिश धार्जिणी राहिली असे म्हणायला वाव आहे.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चिरंजीव एस. गोपाल (सर्वपल्ली गोपाल) लिखित ‘जवाहरलाल नेहरू: अ बायोग्राफी’ हे नेहरूंच्या जीवनावरील विश्वसनीय चरित्र मानले जाते. त्यात पान क्रमांक ४८ वर गंगाधर नेहरू यांचे चित्र आहे. अनेकांनी नेहरू हे मुस्लिमच होते, या दाव्याच्या पुष्ट्यर्थ हे बोट दाखवले. दाढीधारी गंगाधर नेहरू हे एखाद्या मुघलासारखेच वाटतात. ते काश्मीरी ब्राह्मण असल्याचे अजिबातच वाटत नाही. १८५७ च्या बंडानंतर त्यांना कालव्याच्या बाजूचे दिल्लीतील राहते घर सोडून आग्र्यात पलायन करावे लागले, त्यात त्यांच्या कुटुंबांचा सगळा इतिहास आणि दस्तावेज नष्ट झाले, असे एस. गोपाल यांनी त्या चरित्रात लिहिले आहे. कारण तसेच नेहरू त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात. काही जणांच्या मते दिल्लीचा अखेरचा कोतवाल गंगाधर नसून गियासुद्दीन होता. त्यानेच जीव वाचवण्यासाठी गियासुद्दीन हे नाव बदलून गंगाधर हे नाव धारण केले. कुटुंबांचा इतिहास पुसण्यासाठी सगळे दस्तावेज नष्ट झाल्याची बोंब ठोकली.

हे ही वाचा:

देव दीपावलीसाठी ११ लाख दिव्यांनी उजळणार काशी

लाल किल्ला स्फोटाच्या कटात सहभाग नसल्याचा मुजम्मिल, शाहीनचा दावा

३६ तासांनंतर मायक्रोसॉफ्टची सेवा पूर्ववत

हसिनांच्या सुरक्षेची हमी मिळाली तरच पाठवणार

दुसऱ्या बाजूलाही काही पुरावे आहेत. नेहरू घराण्याचे मूळ पुरुष राज कौल हे काश्मीरमधील एक विद्वान संस्कृत आणि फारसी पंडित होते. ऐतिहासिक नोंदींनुसार, १७१६ च्या सुमारास मुघल सम्राट फर्रुखसियर काश्मीर दौऱ्यावर असताना, राज कौल यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन त्यांनी त्यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले. सम्राट फर्रुखसियरने राज कौल यांना निमंत्रण दिल्याचा थेट समकालीन मुघल दस्तावेज आज अस्तित्वात नसल्याचे इतिहासकार एस. गोपाल यांनी स्पष्ट केले आहे. ही माहिती प्रामुख्याने काश्मीरी पंडितांच्या पारंपरिक कुळवृत्तांतात आणि नेहरू घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मौखिक इतिहासावर आधारित आहे. ही माहिती आधी जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात, नंतर एस. गोपाल यांनी नेहरूंच्या चरित्रात, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अभिलेखागारात वकील एन. डी. ओझा यांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर लिहिलेल्या लेखातही याचा उल्लेख आहे. परंतु त्यापैकी कोणीही राज कौल यांचे समकालीन नाही.

गंगाधर नेहरू यांचे वडील पंडित लक्ष्मी नारायण नेहरू हे ईस्ट इंडिया कंपनीचे दिल्लीतील मुघल दरबारातील पहिले ‘वकील’ होते. मुघल बादशहा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संवाद आणि कायदेशीर व्यवहारांमध्ये ते महत्त्वाचा दुवा होते. याचा उल्लेख ब्रिटिशकालीन ‘ईस्ट इंडिया कंपनीच्या रेकॉर्ड्स’मध्ये आढळतो.

स्टॅनले अल्बर्ट वोल्पर्ट हे एक अत्यंत प्रतिष्ठित अमेरिकन इतिहासकार, भारततज्ज्ञ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात दक्षिण आशियाई इतिहासाचे प्राध्यापक होते. आधुनिक भारताचा आणि पाकिस्तानचा इतिहास, तसेच या दोन्ही देशांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांवर त्यांनी अत्यंत सखोल संशोधनपर ग्रंथ लिहिले आहेत. १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘नेहरू: अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ या चरित्रग्रंथाच्या सुरुवातीच्या प्रकरणात स्टॅनले वोल्पर्ट यांनी जवाहरलाल नेहरूंची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या पूर्वजांचा मुघल दरबार ते १८५७ च्या उठावापर्यंतचा प्रवास सविस्तरपणे मांडला आहे. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. राज कौल यांच्या पुढच्या पिढ्यांनी दिल्लीच्या बदलत्या राजकीय सत्तांमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि मुन्शी म्हणून काम केले. यात मोतीलाल नेहरूंचे आजोबा लक्ष्मी नारायण नेहरू यांनी मुघल दरबारात ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले ‘वकील’ (राजकीय प्रतिनिधी) म्हणून काम पाहिल्याचा संदर्भ वोल्पर्ट देतात. वोल्पर्ट यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे की, नेहरू घराण्याच्या या ऐतिहासिक प्रवासामुळे त्यांच्या कुटुंबावर हिंदू काश्मिरी पंडित परंपरांसोबतच मुघल दरबारी उर्दू-फारसी तहजीब आणि नंतरच्या काळात पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा मोठा प्रभाव पडला. या संमिश्र संस्कृतीनेच पुढे मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरूंचे व्यक्तिमत्त्व घडवले.

इतिहासकार एस. गोपाल असे म्हणतात की, पंडित मोतीलाल नेहरूंचे सुरुवातीच्या काळातील विशेषतः १९०७ ते १९१८ दरम्यानचे काँग्रेसमधील सक्रिय होणे हे ब्रिटिश सत्तेसाठी केवळ निरुपद्रवीच नव्हते, तर काही अंशी अनुकूल आणि सोयीचेही होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही एक अत्यंत मवाळ आणि ब्रिटिश सत्तेला धार्जिणी अशी संघटना होती. एस. गोपाल यांनी नमूद केल्याप्रमाणे, त्या काळात काँग्रेसला ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यात किंवा तिच्याकडून मोठ्या सवलती हिसकावून घेण्यातही रस नव्हता; तर केवळ प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये भारतीयांना अधिक संधी मिळाव्यात अशी याचना करण्यातच रस होता. मोतीलाल नेहरू हे स्वतः याच मवाळ नेमस्त विचारसरणीचे खंदे समर्थक होते. १९०७ च्या सुमारास काँग्रेसमध्ये मवाळ आणि ‘जहाल’ (लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय) असे दोन गट पडले होते आणि त्यांच्यात तीव्र तणाव होता. ब्रिटिश सरकारला जहाल गटाच्या आक्रमक राष्ट्रवादाची भीती वाटत होती. अशा वेळी मोतीलाल नेहरूंसारख्या प्रतिष्ठित, उच्चभ्रू आणि कायद्याचे भान ठेवणाऱ्या नेत्याने काँग्रेसमध्ये सक्रिय होणे आणि प्रांतिक परिषदांचे अध्यक्षपद स्वीकारणे, हे जहाल गटाचा प्रभाव रोखण्यासाठी ब्रिटिशांना फायदेशीर वाटत होते. रस्त्यावरच्या आंदोलनाऐवजी अर्ज, विनंत्या, भाषणे आणि कायदेशीर चौकटीत राहूनच मागण्या केल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे जनक्षोभ उसळण्याऐवजी असंतोषाला एक ‘सनदशीर आणि नियंत्रित वाट’ मिळत होती, जी ब्रिटिश प्रशासनाला नेहमीच हवी होती.

जवाहरलाल नेहरू यांचे देशाच्या फाळणीला समर्थन होते, पंतप्रधान झाल्यानंतरही ते लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या सल्ल्याने राज्यकारभार करत होते. मंत्रिमंडळातील अनेक गोपनीय गोष्टींची पत्राद्वारे नियमितपणे लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्यासोबत चर्चा करत. या सगळ्या गोष्टींचा ऊोपोह घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. नेहरू हे हिंदूच होते. त्यांची मानसिकता मनसबदाराची होती. मुघलांच्या काळात त्यांचे घराणे मुघलांची चाकरी करत होते, ब्रिटिशांच्या काळात त्यांचे राजकारण ब्रिटिश धार्जिणे होते.

मोतीलाल नेहरूंपासून सोनिया गांधी यांच्या उपलब्ध चरित्रात खरे किती खोटे किती, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी या खऱ्या खोट्याच्या माध्यमातून त्यांची मुघल-ब्रिटिश धार्जिणी मानसिकता मात्र पुरेशी स्पष्ट होते.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version