देव दीपावलीनिमित्त वाराणसीमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाही हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक वाराणसीत दाखल होण्याची शक्यता आहे. गंगा घाटांवर विशेष गंगा आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, लाइट अँड साउंड शो आणि आतषबाजी हे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण असणार आहे. यावेळी गंगेच्या दोन्ही तीरांवर सुमारे ११ लाख दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. संपूर्ण शहर आकर्षक रोषणाईने सजवण्याची तयारीही सुरू आहे.
वाराणसीचे महापालिका आयुक्त हिमांशू नागपाल यांनी सांगितले की, देव दीपावली हा काशीचा विशेष उत्सव आहे. हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक येतात. यंदा तीन दिवस गंगा आरती आणि गंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. नमो घाटावरही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यात स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
शहर सजवण्यासाठी महापालिकेने आवश्यक तयारी सुरू केली असून, त्यासाठी सर्व कामांचे कार्यादेशही जारी करण्यात आले आहेत. घाटांकडे जाणारे रस्ते, प्रमुख चौक आणि सर्व घाट आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले जाणार आहेत. प्रोजेक्शन शोच्या माध्यमातूनही प्रमुख ठिकाणे उजळवली जातील. दरवर्षीप्रमाणे यंदाही आतषबाजी आणि लाइट अँड साउंड शोचे आयोजन करण्यात येणार आहे.
लाइट अँड साउंड शोमध्ये कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीशी संबंधित धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक कथा दाखवण्यात येतील. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर देवतांनी गंगा घाटांवर दीपोत्सव साजरा केल्याची कथा यातून सादर केली जाणार आहे. अन्य धार्मिक प्रसंगांचाही समावेश असेल.
हे ही वाचा:
दिवाळीत फटाक्यांवरून मुंबईत ८० हून अधिक गुन्हे दाखल
लाल किल्ला स्फोटाच्या कटात सहभाग नसल्याचा मुजम्मिल, शाहीनचा दावा
ब्रिटनमध्ये ७० मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम बिलाल काझीला ३० वर्षांची शिक्षा
भारताच्या परकीय चलनसाठ्यात २.४९ अब्ज डॉलरची वाढ
भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनानेही विशेष नियोजन केले आहे. गंगेत होड्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी दोन्ही बाजूंना स्वतंत्र मार्गिका तयार करण्याची योजना आहे. होड्यांमध्ये क्षमतेनुसारच प्रवासी बसवणे, लाइफ जॅकेटचा वापर, मद्यपान करून होडी न चालवणे आणि होडीचालकांची शारीरिक तंदुरुस्ती तपासणे, अशा सूचना दिल्या जाणार आहेत.
