दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या एच. डी. एफ. सी. परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने यंग बॉइज क्रिकेट क्लब संघावर तब्बल ११६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने निर्धारित ३५ षटकांच्या खेळात ४ बाद २३० धावांचे लक्ष्य उभारले.
अनिश विद्युत (५४) आणि रिदम कचरे (५१) या जोडीने ११५ धावांची सलामी दिली. त्यानंतर शौर्य पाटील (२६), युवराज घरत (४०), आणि शाल्व महरजन (नाबाद ३०) या खेळाडूंनी आपल्या संघाच्या धावसंख्येत आणखी भर घातली. यंग बॉइज क्रिकेट क्लब संघाच्या रुद्राक्ष गवस (३२ धावांत २ बळी ) आणि कबीर सूपल (४१ धावांत २ बळी) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.
या आव्हानाचा पाठलाग करताना यंग बॉइज क्रिकेट क्लब संघाचा डाव ३३.१ षटकांत ११४ धावांत आटोपला. दिशांक मेहता (२२ धावांत ४ बळी) , शाल्व महरजन (१६ धावांत ३ बळी) आणि श्रीयांश तिवारी (२ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीने ही करामत केली. यंग बॉईज संघाच्या भूमिराज मढवी यानेच सर्वाधिक २५ धावा केल्या.
हे ही वाचा:
‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप
लंडनमध्ये हलाल मांसाला विरोध करणाऱ्या भारतीय हॉटेल मालकाला धमक्या
प्रेयसीच्या पतीने जेन्सेनला हनीट्रॅप केले… |
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शाल्व महरजन याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून अचिव्हर्सच्या अनिष् विद्युत (२३५ धावा आणि ६ बळी) याला तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून हर्षित कदम (११ बळी) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून विहान जैस्वाल (८ झेल) (दोघेही यंग बोईस क्रिकेट क्लब) यांना गौरविण्यात आले. मुंबईच्या १४ वर्षाखालील क्रिकेट निवड समितीचे चेअरमन अझीम खान, १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट निवड समितीचे सदस्य जयदीप पाल आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – ३५ षटकांत ४ बाद २३० (अनिश विद्युत ५४, रिदम कचरे ५१, शौर्य पाटील २६, युवराज घरत ४०, शाल्व महरजन नाबाद ३०; रुद्राक्ष गवस ३२ धावांत २ बळी, कबीर सूपल ४१ धावांत २ बळी) वि.वि. यंग बोईस क्रिकेट क्लब – ३३.१ षटकांत सर्वबाद ११४ ( भूमिराज मढवी २५; शाल्व महरजन १६ धावांत ३ बळी, दिशांक मेहता २२ धावांत ४ बळी, श्रीयांश तीवर २ धावांत २ बळी) सामनावीर – शाल्व महरजन.
