२००२ मधील गोध्रा रेल्वे जळीतकांडाचा तपास करणारे सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी शनिवारी या तपासाच्या सुरुवातीच्या काळात माध्यमांचा प्रचंड दबाव होता आणि आधीच ठरवून दिलेले नरेटिव्ह पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू होते, असा खुलासा केला.
एएनआयशी बोलताना अस्थाना यांनी तपासाच्या प्राथमिक टप्प्यात एका प्रसिद्ध पत्रकाराने त्यांची भेट घेतल्याचा प्रसंग सांगितला. संबंधित पत्रकाराने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आपल्या खोलीत प्रवेश केला होता. मात्र, कॅमेऱ्यासमोर मुलाखत देण्यास अस्थाना यांनी नकार दिला. त्यानंतर पत्रकाराशी अनौपचारिक चर्चा झाली.
अस्थाना यांनी सांगितले की, त्यांनी औपचारिक मुलाखत किंवा प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, अनौपचारिकपणे चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. या चर्चेदरम्यान पत्रकाराने गोध्रा रेल्वे जळीतकांडामागे कट होता की नाही, असा थेट प्रश्न विचारला. त्यावेळी तपासाची जबाबदारी स्वीकारून त्यांना अवघे दहा दिवस झाले होते. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे ठरेल, असे त्यांनी पत्रकाराला सांगितले. मात्र, त्यानंतर संबंधित पत्रकाराने दूरचित्रवाणीवर अस्थाना यांचा हवाला देत ‘गोध्रा प्रकरणात कोणताही कट नव्हता, असे सीआयडीचे डीआयजी राकेश अस्थाना यांचे म्हणणे आहे,’ अशा आशयाची बातमी प्रसारित केली.
हे ही वाचा:
१७ वर्षीय क्रिकेटपटू नंदिनीची आत्महत्या
सोनियांविरुद्धची पोस्ट झोंबल्याने काँग्रेसचा कंगनावर एफआयआर
विलीनीकरणाचा चोथा मीडियाच्या तोंडात |
लंडनमध्ये हलाल मांसाला विरोध करणाऱ्या भारतीय हॉटेल मालकाला धमक्या
या प्रसंगाची आठवण सांगताना अस्थाना म्हणाले, “मी १०-११ एप्रिल रोजी तपास सुरू केला होता. मे महिन्यात एक प्रसिद्ध पत्रकार गोध्रा येथे आला. विश्रामगृहात दुपारच्या जेवणासाठी मी माझ्या खोलीत असताना तो कॅमेरामनसह खोलीत आला. मी त्याला सांगितले की, मी तुम्हाला बोलावलेले नाही, त्यामुळे कृपया कॅमेरामनला बाहेर पाठवा. तुम्हाला माझ्याशी बोलायचे असेल तर अनौपचारिकपणे चर्चा करू शकता; मात्र मी कोणतीही मुलाखत देणार नाही. त्यानंतर आमची दोन ते चार मिनिटे चर्चा झाली.”
ते पुढे म्हणाले, “त्यांनी मला एकच प्रश्न विचारला. गोध्रा प्रकरणामागे कट होता की नाही, असे तुम्हाला वाटते? त्यावर मी सांगितले की, मला तपासाची जबाबदारी स्वीकारून अद्याप दहा दिवसही झालेले नाहीत. त्यामुळे यावर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल. मात्र, तेथून गेल्यानंतर त्यांनी दूरचित्रवाणीवर बातमी चालवली की, सीआयडीचे डीआयजी राकेश अस्थाना यांच्या मते गोध्रा प्रकरणात कोणताही कट नव्हता.”
त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देताना अस्थाना यांनी सांगितले की, या घटनेला केवळ अपघात ठरवणे हे एका विशिष्ट राजकीय नरेटिव्हचा भाग होते. गोध्रा रेल्वे जळीतकांड हा कट असल्याचे सिद्ध झाले, तर त्यानंतर झालेल्या दंगलींनाही कट म्हणता येणार नाही, अशा प्रकारचे कथानक पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू होते, असे त्यांनी नमूद केले.
अस्थाना म्हणाले, “त्यावेळी मोठा वाद निर्माण करण्यात आला होता. एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नरेटिव्हला पोषक ठरेल अशा पद्धतीने गोष्टी मांडल्या जात होत्या. हेच कथानक तयार करायचे होते. गोध्रा प्रकरण कट असल्याचे सिद्ध झाले, तर दंगली कट असू शकत नाहीत, असा यामागचा तर्क होता. मी या कथानकाच्या आड येत होतो. कारण मी व्यावसायिक दृष्टिकोनातून तपास करत होतो आणि हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे मला दिसत होते.”
गोध्रा रेल्वे जळीतकांडाच्या तांत्रिक बाबींवरही अस्थाना यांनी भाष्य केले. संबंधित रेल्वे डब्यातील आसने, फरशी आणि छत तयार करण्यासाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण डब्याला अवघ्या दहा मिनिटांत आग लागली, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, “त्या डब्यात आग अपघाताने लागली असती, तर ज्वलनशील नसलेल्या साहित्यामुळे संपूर्ण डबा जळण्यासाठी अनेक तास लागले असते. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वापरण्यात आलेले साहित्य ज्वलनशील होते, हे आम्ही तपासातून सिद्ध केले होते.”
गोध्रा रेल्वे जळीतकांड हा पूर्वनियोजित गुन्हेगारी कट असल्याचे तपासातून सिद्ध केल्यामुळे रेल्वे जळीतकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या व्यापक हिंसाचाराचा एकमेकांशी संबंध नाकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नरेटिव्हना धक्का बसला, असेही अस्थाना यांनी सांगितले. दरम्यान, गोध्रा रेल्वे जळीतकांडाची चौकशी करणाऱ्या नानावटी आयोगानेही ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष नोंदवला होता.
