एनव्हिडियाचे (Nvidia) सीईओ जेन्सेन हुआंग याला हनीट्रॅप करण्यात आले आहे, या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब होत चालले आहे. या प्रकरणात दररोज होणाऱ्या नव्या गौप्यस्फोटांमुळे अमेरिका प्रचंड हादरली आहे. जगात सुरू असलेल्या चिप युद्धाची तीव्रता यामुळे चव्हाट्यावर आलेली आहेच, शिवाय कॉर्पोरेट जगतात नीतिमूल्यांचा झालेला कडेलोटही स्पष्ट झालेला आहे. ज्या ॲलिस हुआंगशी जेन्सेन यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे, तिला तिचा पती कांग वेईनेच जेन्सेनपर्यंत नेले होते. पत्नीच्या अवैध संबंधांबाबत तिच्या पतीला माहिती होती. त्याने ते केवल स्वीकारलेच नव्हे तर आपल्या व्यवसायाला चमकवण्यासाठी तो या संबंधांचा वापर करत होता. जेन्सेन यांच्या या प्रकरणामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही चांगलेच रगडले जात आहेत. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने (The Wall Street Journal) १२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या या विशेष तपास अहवालात या प्रकरणाचे अनेक धक्कादायक पैलू उघड केले आहेत. चिनी उद्योगपती कांग वेई (वय ५१) आणि जेन्सेन हुआंग हे गेल्या सुमारे १० वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. २०१० च्या दशकात जेव्हा कांग वेई चीनमधील व्हिडिओ गेम कंपन्या विकत घेत होते, तेव्हा त्या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण झाले होते. त्या काळात गेमिंग कंपन्यांसाठीच एनव्हिडियाच्या ग्राफिक्स चिप्सचा पुरवठा केला जायचा. कांग वेई यानेच स्वतः जेन्सेन हुआंग यांची ओळख आपली पत्नी ॲलिस हुआंग हिच्याशी करून दिली होती. त्याला आपली पत्नी ॲलिस आणि जेन्सेन हुआंग यांच्यातील प्रेमसंबंधांची पूर्ण कल्पना होती. धक्कादायक म्हणजे, त्याने याला विरोध करण्याऐवजी ते स्वीकारले होते.
