झारखंडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. सिमडेगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भूषण बाडा यांच्यावर १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रांचीतील धुर्वा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडित मुलगी आदिवासी समाजातील असून तिला शिक्षण आणि शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन रांची येथे आणण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला आमदारांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते.
कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीला शिक्षणासाठी मदत करण्याच्या नावाखाली रांची येथे आणण्यात आले; मात्र तिच्याकडून घरातील कामे करून घेतली जात होती. कामात उशीर झाल्यास तिच्यासोबत मारहाण आणि शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप आहे. तसेच तिला पुरेसे जेवणही दिले जात नव्हते. याच काळात आमदारांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही पीडितेने म्हटले आहे.
हे ही वाचा:
सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन ९६० रुपयांत विकणारा लोखंडे निलंबित
रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक
छायाचित्रांतून उलगडणार ताडोबाचे जंगलविश्व!
एनविडिया सीईओपदासाठी टीम कूकसह तीन भारतीय
काही काळानंतर पीडित मुलीने कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी आणि जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, आमदार भूषण बाडा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. हे आरोप राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, भाजपने या प्रकरणी आमदारांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून झारखंडमधील राजकीय वातावरण तापले असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
