ब्रिटनमध्ये ७० हून अधिक अल्पवयीन मुलींचे ऑनलाइन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी २७ वर्षीय बिलाल काझी याला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय सुटकेनंतर त्याच्यावर आठ वर्षांचे विस्तारित देखरेख परवाना निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर २०२६) चेस्टर क्राउन न्यायालयाने हा निकाल दिला. मूळचा मुंबईचा रहिवासी असलेल्या काझीने बालकांविरोधातील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित ३७ आरोपांची कबुली दिली होती.
बिलाल काझी हा बर्मिंगहॅममधील ह्युबर्ट क्रॉफ्ट परिसरात राहत होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याच्या एका पीडित मुलीने डर्बीशायर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. संबंधित मुलीने पोलिसांना सांगितले की, ती १३ वर्षांची असताना स्नॅपचॅटवरून तिची काझीशी ओळख झाली होती. सुरुवातीला तिला काझी आपल्याच वयाचा असल्याचे वाटत होते.
मात्र, काही काळानंतर स्नॅपचॅटवरील संवादाचे स्वरूप बदलले. काझी तिच्याशी अश्लील स्वरूपाचे प्रश्न विचारू लागला आणि तिच्याकडे नग्न छायाचित्रे व व्हिडिओंची मागणी करू लागला. जुलै २०२१ मध्ये मुलीने केवळ मैत्री ठेवण्याची इच्छा व्यक्त करत छायाचित्रे पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर काझीने तिला धमकावण्यास सुरुवात केली. ‘तू माझी मालमत्ता आहेस,’ असे सांगत त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या मुलीने त्याला छायाचित्रे पाठवणे सुरूच ठेवले.
दरम्यान, संबंधित मुलीचे स्नॅपचॅट खाते हॅक झाले. त्यानंतर तिने काझीला पाठवलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ तिच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यात आले. या घटनेनंतर तिने डर्बीशायर पोलिसांकडे धाव घेत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मे २०२२ मध्ये चेशायर पोलिसांच्या ऑनलाइन बाल लैंगिक अत्याचार तपास पथकाने (ओसीएआयटी) या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला.
हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्यात २.४९ अब्ज डॉलरची वाढ
डॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना वन इंडिया पुरस्कार
भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा लवकरच
भारताच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये मोठी झेप
बिलालने घेतले पीएचडीचे शिक्षण
पोलिसांच्या माहितीनुसार, मूळचा मुंबईचा असलेला बिलाल काझी चेस्टर येथे पीएचडीचे शिक्षण घेत होता. त्यानंतर त्याने बर्मिंगहॅम विद्यापीठात प्रवेश घेत रसायनशास्त्राचा अभ्यास केला. सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर तो ‘रीस’ नावाच्या एका गोऱ्या ब्रिटिश किशोरवयीन मुलाची बनावट ओळख धारण करत असे. रॉब्लॉक्स, स्नॅपचॅट, विझ आणि विंक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता.
१० ते १७ वर्षे वयोगटातील मुलींना लक्ष्य करून त्यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आभास तो निर्माण करत असे. बनावट ओळखीच्या माध्यमातून मुलींचा विश्वास संपादन केल्यानंतर तो त्यांच्याकडून अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ मागवत असे. प्रेमसंबंधांमध्ये अशा प्रकारची छायाचित्रे पाठवणे सामान्य असल्याचे भासवून तो मुलींची दिशाभूल करत होता. ज्या मुली त्याच्या मागण्या मान्य करत नसत, त्यांना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली जात असे.
२०२१ ते २०२५ या कालावधीत सुमारे पाच वर्षे त्याचे हे गुन्हेगारी कृत्य सुरू होते. काझी देशाबाहेर गेल्यामुळे तपास यंत्रणांना त्याला तातडीने अटक करता आली नाही. अखेर जुलै २०२३ मध्ये तो ब्रिटनमध्ये परतला असताना हिथ्रो विमानतळावर त्याला अटक करण्यात आली.
अटकेनंतर त्याचा मोबाइल फोन जप्त करून न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आला. या तपासात ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाचे अत्यंत मोठे जाळे उघडकीस आले. तपास अधिकाऱ्यांच्या मते, ओसीएआयटीच्या इतिहासातील हा अशा प्रकारचा सर्वात मोठा गुन्हेगारी तपास होता.
काझीच्या मोबाइलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी १८० संभाव्य पीडित मुलींची ओळख पटवली. त्यापैकी ७० मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. या सर्व मुलींचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यांच्याशी संबंधित गुन्ह्यांची माहिती तपासात समोर आली.
ऑगस्ट २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी काझीवर एकूण ३९ आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३७ आरोपांची त्याने न्यायालयात कबुली दिली. त्यानंतर न्यायालयाने त्याला ३० वर्षांचा तुरुंगवास आणि सुटकेनंतर आठ वर्षांच्या विस्तारित देखरेखीची शिक्षा सुनावली.
