बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याबाबत भारत आणि बांगलादेशदरम्यान पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, हसीना यांच्या सुरक्षेची आणि निष्पक्ष न्यायप्रक्रियेची हमी मिळाल्यानंतरच त्यांना परत पाठवण्याची भारताची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी भारताने बांगलादेशसमोर दोन अटी ठेवल्याचा दावा बीबीसी बांगलाने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. हसीना यांनी डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलनामुळे हसीना यांचे सरकार कोसळले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी त्या बांगलादेशच्या लष्करी विमानातून भारतात आल्या. तेव्हापासून त्या भारतात वास्तव्यास आहेत. दरम्यान, बांगलादेशातील न्यायालयाने २०२४ मधील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. बांगलादेश सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणीही केली आहे.
हे ही वाचा:
‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप
हलाल मांस न विकण्यावरून लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंट मालकाला धमक्या
पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी
नांदेडमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा
वृत्तानुसार, पहिली अट हसीना यांच्या सुरक्षित परतीशी संबंधित आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी बांगलादेशचे लष्करी विमान आले होते. त्यामुळे त्यांना परत नेण्याची जबाबदारीही बांगलादेशच्या लष्कराने घ्यावी, अशी भारताची भूमिका आहे. त्यासाठी दिल्लीला लष्करी विमान पाठवणे किंवा सीमेवर लष्करी अधिकाऱ्यांकडे त्यांचा ताबा देणे असे पर्याय सुचवण्यात आले आहेत. दुसरी अट न्यायप्रक्रियेशी संबंधित आहे. हसीना यांना मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात अपील करण्याची संधी मिळावी आणि त्यांच्यावरील आरोपांवर नव्याने निष्पक्ष खटला चालवण्याची हमी द्यावी, अशी भारताची मागणी असल्याचे वृत्त आहे. या खटल्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय आणि जागतिक माध्यमांचे लक्ष असावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ९ नोव्हेंबरला हसीना यांनी नव्या पासपोर्ट आणि प्रवासविषयक कागदपत्रांसाठी अर्ज केला. मात्र, बांगलादेश सरकारकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
