घरक्राईमनामासीएसएमटी स्थानकाला बॉम्बने उडविण्याची धमकी

सीएसएमटी स्थानकाला बॉम्बने उडविण्याची धमकी

मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने शनिवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. लोहमार्ग पोलिसांच्या वाडीबंदर येथील नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून सीएसएमटी स्थानकात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. या धमकीनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोलिसांची तातडीने धावपळ सुरू झाली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), लोहमार्ग पोलीस आणि मुंबई पोलिसांची पथके तातडीने स्थानक परिसरात दाखल झाली.

धमकीच्या फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण स्थानकाची तपासणी सुरू करण्यात आली. स्थानकातील फलाट, प्रवाशांची ये-जा असणारे परिसर, पादचारी पूल, पार्सल विभाग तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांची कसून झडती घेण्यात आली. त्याचबरोबर स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांचीही तपासणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू नजरेस पडू नये, यासाठी सुरक्षा पथकांनी प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली.
हे ही वाचा:
सीएसएमटी स्थानकाला बॉम्बने उडविण्याची धमकी

किश्तवाडच्या दुर्गम जंगलात दहशतवाद्यांचा शोध

मराठवाड्याचं करायचं काय, करावा कोणता उपाय?

रत्नागिरी विमानतळ सज्ज; जानेवारीपासून विमानांचे उड्डाण!

सुमारे तीन तास सुरक्षा यंत्रणांची ही शोधमोहीम सुरू होती. रात्री साडेनऊच्या सुमारास तपासणी पूर्ण करण्यात आली. मात्र, या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणतीही स्फोटक वस्तू किंवा संशयास्पद साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे बॉम्ब ठेवल्याचा दावा निराधार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, धमकीचा फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. संबंधित दूरध्वनी क्रमांक आणि त्यामागील व्यक्तीची माहिती मिळविण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

मुंबईचे सर्वाधिक वर्दळीचे आणि महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या सीएसएमटीला मिळालेल्या या धमकीमुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणासुदीचा काळ आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता अशा धमकींकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. त्यामुळे सीएसएमटीसह मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या फोनमुळे तीन तास संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असली, तरी अशा धमक्यांमागील व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version