‘ऑपरेशन सिंदूर’ने भारत स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या बळावर युद्ध लढण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. या मोहिमेत तिन्ही सैन्यदलांमधील समन्वय, संयुक्त नियोजन आणि लष्करी क्षमतांचे एकत्रीकरण प्रभावीपणे दिसून आले, असे संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी सांगितले. भविष्यातील युद्धांसाठी भारताने पाच महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे सोमवारी आयोजित ‘एएनआय नॅशनल सिक्युरिटी समिट ३.०’मध्ये ते बोलत होते. आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत असून, केवळ अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरेशी नाहीत. त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि बदलत्या परिस्थितीनुसार तंत्रज्ञानात सुधारणा करण्याची क्षमता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यातील युद्धाचे पाच निर्धार
मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचे उत्पादन, औद्योगिक क्षमता, अंतराळ तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाशी वेगाने जुळवून घेण्याची क्षमता आणि युद्धभूमीचा विस्तार हे पाच महत्त्वाचे निर्धार असल्याचे सुब्रमणी यांनी सांगितले. महागड्या शस्त्रांसोबतच कमी खर्चातील ड्रोन आणि उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे गरजेचे आहे. शत्रूच्या रणनीतीनुसार तातडीने उपाय शोधण्यासाठी अभियंते आणि संशोधकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता लक्षात घेता भारताकडे मजबूत औद्योगिक क्षमता, उत्पादनाचा वेग आणि अखंड पुरवठा साखळी असणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या संरक्षण उपकरणांच्या निर्मितीचे तंत्रज्ञानही देशाच्या नियंत्रणात असले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिका-इराण संघर्षाचा संदर्भ देत त्यांनी अंतराळ तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. उपग्रहांद्वारे मिळणारी माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने लक्ष्यांचा अचूक वेध घेणे शक्य होत आहे.
हे ही वाचा:
‘रामायण’ बॉक्स ऑफिस कमाईत १,४०० कोटींच्या उंबरठ्यावर
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावरील गोळीबाराचा कट उधळला
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन?
भूपेश बघेल यांच्या मुलाच्या ३५५ भूखंडांवर ईडीचा ताबा
भविष्यात युद्ध केवळ सीमांपुरते मर्यादित राहणार नाही. उद्योग, ऊर्जा केंद्रे, दळणवळण यंत्रणा आणि नागरी पायाभूत सुविधाही लक्ष्य होऊ शकतात. त्यामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबतच त्यात वेगाने सुधारणा करणे आवश्यक आहे. संरक्षण दल, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्स यांनी एकत्रितपणे काम करून कुशल मनुष्यबळ विकसित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
