बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी दोन संशयित शूटरना अटक करण्यात आली आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या एका गुंडाच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. १९८४ मधील शीखविरोधी दंगलींबाबत अमिताभ बच्चन यांनी कथितरीत्या केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याची योजना होती, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. मात्र, बच्चन यांनी अशी विधाने केल्याचा आरोप यापूर्वीच फेटाळला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास ठाकूर ऊर्फ विक्की (२५) आणि दीपक सिंह ऊर्फ दीप अशी आहेत. विकास हा पंजाबमधील जालंधरचा, तर दीपक हा तरनतारनचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली आणि मुंबईत स्वतंत्र कारवाया करून दोघांना अटक केली.
हे ही वाचा:
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन?
भूपेश बघेल यांच्या मुलाच्या ३५५ भूखंडांवर ईडीचा ताबा
अर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली
राजस्थान रेल्वे ट्रॅक स्फोटप्रकरणी पाक कनेक्शन उघड!
पोलिसांच्या माहितीनुसार, विकासला एका व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबार करण्याच्या उद्देशाने मुंबईहून दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी दीपकचा शोध घेतला. तो मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दीपकला मुंबईत अधिक काळ थांबून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समोर आले.
