घरविशेषमोदींचा फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख; ‘बारॉन्ग टागालॉग’ने वेधले लक्ष

मोदींचा फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख; ‘बारॉन्ग टागालॉग’ने वेधले लक्ष

गाला डिनरला पंतप्रधानांची खास उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास पेहरावासाठीही ओळखले जातात. मात्र, यावेळी त्यांनी नेहमीच्या कुर्ता-पायजम्याऐवजी फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे ४९ व्या आसियान शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित गाला डिनरमध्ये मोदी ‘बारॉन्ग टागालॉग’ या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी या डिनरचे आयोजन केले होते.

पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेला बारॉन्ग टागालॉग हा फिलिपाइन्समधील पुरुषांचा पारंपरिक आणि औपचारिक राष्ट्रीय पोशाख आहे. हा पोशाख विशेषतः विवाहसोहळे, औपचारिक समारंभ आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये वापरला जातो. हलक्या आणि काहीशा पारदर्शक कापडापासून तयार केला जाणारा हा शर्ट पँटच्या बाहेर ठेवून घालण्याची पद्धत आहे. या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील नक्षीकाम आणि भरतकाम. फुलांच्या, भौमितिक आकारांच्या तसेच निसर्गाशी संबंधित आकर्षक आकृत्यांनी हा पोशाख सजवला जातो. पारंपरिक पद्धतीने तो अननसाच्या पानांपासून तयार होणाऱ्या ‘पिना’ या विशेष कापडापासून किंवा ‘जुसी’ या तलम कापडापासून बनवला जातो. आधुनिक काळात इतर कापडांचाही वापर केला जातो.

नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या बारॉन्ग टागालॉगवरही आकर्षक भरतकाम होते. त्यासोबत त्यांनी सोनेरी रंगाचे ब्रोच आणि हिरव्या रंगाची सजावट असलेला गुलाबाच्या आकाराचा लॅपल पिन लावला होता. विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनीही याच प्रकारचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. तर फिलिपाइन्सच्या प्रथम महिला लुईस मार्कोस यांनी निळ्या रंगाच्या भरतकामाने सजलेला हस्तिदंती रंगाचा गाऊन परिधान केला होता.

हे ही वाचा:

दहशतवादविरोधी कारवायांसाठी ‘फोर्स वन’ एटीएसच्या नियंत्रणाखाली

चीनचा हवाई वाहतुकीत नवा अध्याय! इलेक्ट्रिक विमान झेपावले

श्रीगंगानगर स्फोटप्रकरणी आणखी दोन बॉम्ब जप्त

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताची खरी ‘अग्निपरीक्षा’

या गाला डिनरमध्ये फिलिपाइन्सच्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्थानिक खाद्यपदार्थांचीही मेजवानी होती. मोदी १६ ते १७ नोव्हेंबरदरम्यान फिलिपाइन्सच्या दौऱ्यावर असून, २३ व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version