ब्रिटानियाची चौथ्या तिमाहीत ₹६७९ कोटींची कमाई

गुंतवणूकदारांना देणार मोठा लाभांश

ब्रिटानियाची चौथ्या तिमाहीत ₹६७९ कोटींची कमाई

ब्रिटानिया इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत दमदार आर्थिक निकाल जाहीर करत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीचा निव्वळ नफा तब्बल ₹६७९ कोटींवर पोहोचला असून, यामध्ये वार्षिक आधारावर सुमारे २१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मजबूत विक्री, प्रीमियम उत्पादनांना वाढती मागणी आणि स्थिर ऑपरेटिंग कामगिरीमुळे कंपनीला हा फायदा झाला आहे. यासोबतच कंपनीने भागधारकांसाठी प्रति शेअर ₹९०.५० अंतिम लाभांश जाहीर केला आहे.
मार्च २०२६ अखेर संपलेल्या तिमाहीत ब्रिटानियाचा महसूलही वाढला आहे. कंपनीचा एकत्रित महसूल ₹४,७१९ कोटींवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे ६.५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा EBIT म्हणजेच व्याज आणि करापूर्वीचा नफा ₹८५३ कोटींवर गेला आहे. मात्र EBITDA मार्जिन १८.२ टक्क्यांवरून किंचित घसरून १८.१ टक्क्यांवर आले आहे.
हे ही वाचा:
चंद्रनाथ रथना मारण्यासाठी ओएलएक्सवरच्या गाडीचा नंबर हल्लेखोरांनी केला कॉपी

रियान परागनंतर युझवेंद्र चहलचा ‘वेप स्मोकिंग’ व्हिडिओ व्हायरल

निदा खानला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी

छत्तीसगडमधील नक्षलमुक्त पोलमपल्लीमध्ये कायमस्वरूपी रेशन दुकान सुरू!
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रक्षित हरगावे यांनी सांगितले की, तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांत व्यवसायात सुमारे ९ टक्के वाढ दिसून आली होती. मात्र मार्च महिन्यात पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसायात पुरवठा साखळीवर परिणाम झाला आणि वाढीचा वेग मंदावला. तरीही देशांतर्गत बाजारपेठेत बिस्किट, क्रोसाँ आणि वेफर्ससारख्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः ‘लिटल हार्ट्स’ आणि ‘जिम जॅम’ या ब्रँड्सनी दुहेरी अंकातील वाढ नोंदवली.
ई-कॉमर्स क्षेत्रातही ब्रिटानियाने मोठी झेप घेतली आहे. कंपनीच्या देशांतर्गत व्यवसायात आता ई-कॉमर्सचा वाटा सुमारे ६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑनलाईन ग्राहकांसाठी विशेष उत्पादने आणि प्रीमियम सेगमेंटवर भर दिल्यामुळे विक्री वाढण्यास मदत झाली आहे.
संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर ब्रिटानियाचा एकत्रित निव्वळ नफा ₹२,५३७ कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १६.५ टक्के जास्त आहे. कंपनीची वार्षिक विक्रीही ₹१८,८५८ कोटींवर गेली आहे.
दरम्यान, चांगले निकाल जाहीर करूनही शेअर बाजारात ब्रिटानियाच्या शेअरवर दबाव दिसून आला. कंपनीने वाढत्या कच्चामाल आणि वाहतूक खर्चामुळे पुढील काळात किंमती वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर शेअरमध्ये घसरण झाली. बाजार विश्लेषकांच्या मते, पश्चिम आशियातील तणावामुळे इनपुट कॉस्ट वाढण्याची शक्यता असल्याने कंपनीसमोर मार्जिन टिकवण्याचे आव्हान राहणार आहे.

Exit mobile version