आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट एअरलाइनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक विमानांची उड्डाणे रद्द होत असताना आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध आलेले असतानाही कंपनीकडून तिकिटांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतली असून कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे स्पाइसजेटच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २४ नोव्हेंबरच्या दिल्ली-दुबई आणि दिल्ली-मुंबई विमानांसाठी स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटवर तिकीट बुकिंग सुरू असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, विमानसेवा विस्कळीत असतानाही प्रवाशांना संभाव्य अडचणींबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या नव्हत्या. दिल्ली-दुबई विमानाचे तिकीट सुमारे ३० हजार २८४ रुपयांना उपलब्ध होते. मुंबई-दुबई मार्गावरील SG-5060 या विमानाचे उड्डाण सलग सात दिवस झाले नसतानाही तिकीट विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
पुणे बनतेय देशाचे ऑटोमोबाईल हब
पुणे-लोणावळ्यातील १४ हॉटेल्ससह दोन डार्क स्टोअरवर एफडीएचा बडगा
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन
राजस्थानमध्ये भीषण अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू
दरम्यान, दुबई विमानतळावर स्पाइसजेटच्या सेवांना मोठा फटका बसला आहे. ग्राउंड हँडलिंग कंपनी DNATA चे सुमारे १४ दशलक्ष दिरहॅम म्हणजेच जवळपास ३५.८ कोटी रुपयांचे देणे थकल्यामुळे १२ नोव्हेंबरपासून विमानतळावर चेक-इन सेवा स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय, विमानांची उड्डाणे रद्द होणे, वेळापत्रकाचे पालन न करणे आणि प्रवाशांना अपुऱ्या सुविधा मिळणे यांसारख्या आठ मुद्द्यांवर DGCA ने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
स्पाइसजेटकडे सुमारे ५० विमानांचा ताफा असला तरी प्रत्यक्षात केवळ पाच विमाने कार्यरत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीचा देशांतर्गत विमान वाहतूक बाजारातील हिस्सा ०.६ टक्क्यांवर घसरला आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनी ५,५०० कोटी रुपये उभारण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, आर्थिक पुनरुज्जीवनासोबतच प्रवाशांचा विश्वास संपादन करणे आणि विस्कळीत विमानसेवा पूर्ववत करणे हे स्पाइसजेटसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
