कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्याच्या तयारीत असलेले उद्योगपती एलॉन मस्क आता थेट अंतराळात एआय डेटा सेंटर उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहेत. मस्क यांच्या स्पेसएक्सने या प्रकल्पासाठी जर्मनीतील सिंगुलस टेक्नॉलॉजीज या कंपनीसोबत सुमारे ६२० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या एआय उपग्रहांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सौरऊर्जा उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. अंतराळातच मोठ्या प्रमाणावर संगणकीय क्षमता विकसित करण्याच्या स्पेसएक्सच्या योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या कराराअंतर्गत सिंगुलस टेक्नॉलॉजीज स्पेसएक्ससाठी हेटेरोजंक्शन (HJT) तंत्रज्ञानावर आधारित सौरपेशी तयार करण्यासाठी अत्याधुनिक उत्पादन यंत्रणा विकसित करणार आहे. या सौरपेशी सूर्यप्रकाशातून अधिक कार्यक्षमतेने वीज निर्माण करू शकतात. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील बॅस्ट्रॉप येथे स्पेसएक्सच्या उपग्रह निर्मिती प्रकल्पासाठी ही यंत्रणा उभारली जाणार असून, २०२७ च्या पहिल्या सहामाहीत तिचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. भविष्यात या उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्याचीही कंपनीची योजना आहे.
हे ही वाचा:
महापौर कार्यालयासह मुंबईतील सहा ठिकाणांना धमकी
भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी बांगलादेशच्या भूमीचा वापर
केजरीवालांना धमकी देणारा फोन बिष्णोई गँगचा नव्हे, भुरट्याचा
मुंबईवर पाणीटंचाईचे सावट? आठ वर्षांतील नीचांकी साठा
मस्क यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट अंतराळात मोठ्या प्रमाणावर एआय संगणकीय यंत्रणा उभारणे हे आहे. यासाठी पृथ्वीच्या कक्षेत अनेक उपग्रह तैनात केले जातील. हे उपग्रह सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रक्रिया पार पाडतील. त्यानंतर लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपग्रहांमधील माहितीची देवाणघेवाण केली जाईल आणि आवश्यक डेटा पृथ्वीवर पाठवला जाईल. सध्या एआय डेटा सेंटरसाठी प्रचंड वीज, मोठ्या प्रमाणावर जागा आणि सर्व्हर थंड ठेवण्यासाठी अत्याधुनिक शीतकरण यंत्रणा आवश्यक असते. मात्र, अंतराळातील सूर्यप्रकाशाचा थेट वापर केल्यास ऊर्जेची उपलब्धता आणि डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांवरील खर्चाच्या दृष्टीने नवे पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
स्पेसएक्सची ही योजना प्रत्यक्षात उतरल्यास एआय उद्योगाच्या भविष्यात मोठे परिवर्तन घडू शकते. विशेषतः वाढत्या एआय तंत्रज्ञानामुळे जगभरात डेटा सेंटरची मागणी वेगाने वाढत असताना अंतराळातील संगणकीय यंत्रणा हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो. मात्र, अंतराळातील उपकरणांची देखभाल, प्रचंड खर्च, डेटा प्रसारणातील तांत्रिक अडचणी आणि उपग्रहांच्या मोठ्या समूहाचे व्यवस्थापन अशी अनेक आव्हाने या प्रकल्पासमोर आहेत. त्यामुळे एलॉन मस्क यांची ही अंतराळातील एआय क्रांती प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण तंत्रज्ञान आणि उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे.
