मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी (१२ नोव्हेंबर) पुन्हा एकदा प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये मुंबईच्या महापौर कार्यालयासह शहरातील बँक, न्यायालय, अभिनेता अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
गुरुवारी सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी हा ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर महापौर कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने तातडीने कार्यालयाची तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे कार्यालयातील नियमित कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा:
यूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती
मुंबईवर पाणीटंचाईचे सावट? आठ वर्षांतील नीचांकी साठा
बदरकूटच्या जंगलातून दोन हँड ग्रेनेड जप्त
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी
विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांत महापौर कार्यालयाला अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल मिळण्याची ही तिसरी घटना आहे. यावेळी एक-दोन नव्हे, तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये ‘खलिस्तान बोलेगा, मुंबई जिंदाबाद’ असा मजकूरही असल्याचे वृत्त आहे.
