घरविशेषशत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!

शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे सैन्याला आवाहन

आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या पारंपरिक तसेच नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी संरक्षण दलांनी आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर सज्ज राहावे. शत्रूला अनपेक्षित धक्का देण्याची क्षमता विकसित करण्याबरोबरच ती कायम टिकवून ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत ते बोलत होते. गुप्तचर आणि टेहळणी यंत्रणा अधिक सक्षम करणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे आणि संभाव्य धोके निर्माण होण्यापूर्वीच त्यांचा अंदाज घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाच्या डिजिटायझेशन, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ॲप्लिकेशन नेटवर्किंग (UDAAN) युनिटच्या कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राने विकसित केलेल्या विविध AI ॲप्लिकेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. हवाई दलाच्या सुरक्षित नेटवर्कवर कार्यान्वित करण्यात आलेल्या या ॲप्लिकेशन्समुळे हवाई मोहिमा, प्रशासकीय कामकाज आणि हवाई क्षेत्राच्या सुरक्षिततेशी संबंधित कामे स्वयंचलित होतील आणि ती अधिक वेगाने पूर्ण करता येतील.

यावेळी बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले, “आपल्या संरक्षण दलांनी अशा क्षमता आणि कार्यपद्धती विकसित केल्या पाहिजेत की शत्रूला विचार करण्याची किंवा सावरण्याची संधी मिळणार नाही, त्याचवेळी शत्रूच्या अनपेक्षित हालचालींमुळे आपणही बेसावध राहता कामा नये. पारंपरिक युद्धपद्धतींबरोबरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाही वापर करून शत्रूला अनपेक्षित धक्का देता येतो. यासाठी गुप्तचर आणि टेहळणी यंत्रणा अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. आपले जवान कोणत्याही नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सतर्क, तत्पर आणि सज्ज असले पाहिजेत.”

हे ही वाचा:

महापौर कार्यालयासह मुंबईतील सहा ठिकाणांना धमकी

यूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती

मुंबईवर पाणीटंचाईचे सावट? आठ वर्षांतील नीचांकी साठा

बदरकूटच्या जंगलातून दोन हँड ग्रेनेड जप्त

आजचे युद्ध केवळ पारंपरिक रणांगणापुरते मर्यादित राहिलेले नाही. क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि अत्याधुनिक शस्त्रप्रणालींच्या वापरामुळे प्रत्यक्ष संपर्काशिवाय लढल्या जाणाऱ्या युद्धाचे महत्त्वही वाढत आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. आत्मघाती ड्रोन, टेहळणी आणि ड्रोनविरोधी मोहिमा यांसारख्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कमांडर्सनी पूर्णपणे सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक युद्ध, सायबर आणि अवकाश या नव्या क्षेत्रांतील आव्हानांचा विचार करून भारतीय हवाई दलाने त्यासाठी स्वतंत्र कार्यनीती आणि यंत्रणा विकसित कराव्यात, असे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले. या क्षेत्रांतील तयारी मजबूत केल्यास भविष्यातील आव्हानांचा सामना करणे अधिक सोपे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version