घरबिजनेसनॉर्वेने तेलाच्या उत्पन्नातून केले पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित

नॉर्वेने तेलाच्या उत्पन्नातून केले पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित

उभारला $2 ट्रिलियनचा निधी

नॉर्वे या देशाने तेलासारख्या संपणाऱ्या नैसर्गिक साधनाचा वापर करून जगासमोर आर्थिक शिस्तीचा आदर्श ठेवला आहे. आज नॉर्वेकडे सुमारे $2 ट्रिलियन किमतीचा राष्ट्रीय गुंतवणूक निधी असून, हा निधी पुढील अनेक पिढ्यांसाठी देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

१९६९ साली नॉर्वेला उत्तर समुद्रात मोठ्या प्रमाणावर तेल सापडलं. त्या वेळी अनेक देश असते तर अचानक खर्च वाढवला असता, मोठ्या योजना राबवल्या असत्या. मात्र नॉर्वेने घाई न करता शांत आणि दीर्घकालीन विचार केला. तेल ही कायमची संपत्ती नाही, हे ओळखून त्यांनी आजच्या उत्पन्नाचा वापर उद्याच्या सुरक्षिततेसाठी करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
यूएईच्या रिअल इस्टेटमध्ये भारतीय गुंतवणूक वाढतेय!

डॉलर कमजोर; भू-राजकीय तणावामुळे सोने-चांदी झळाळले!

“गोगोई यांनी पाकिस्तान गृहमंत्रालयाने दिलेले पत्र सार्वजनिक करावे”

कर्नाटकातील विजयपुरा येथे प्रशिक्षण विमानाचा अपघात

याच विचारातून १९९० मध्ये नॉर्वे सरकारने राष्ट्रीय गुंतवणूक निधी स्थापन केला. तेल आणि गॅस विक्रीतून मिळणारा अतिरिक्त पैसा थेट या निधीत जमा केला जाऊ लागला. हा पैसा तात्काळ सरकारी खर्चासाठी न वापरता भविष्यासाठी गुंतवला गेला. सरकारने सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं की हा निधी सध्याच्या पिढीसोबतच येणाऱ्या पिढ्यांसाठीही आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हा निधी प्रामुख्याने देशाबाहेर गुंतवण्यात आला. जगभरातील शेअर्स, बाँड्स आणि काही मालमत्तांमध्ये हा पैसा गुंतवण्यात आला. यामागचं मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत महागाई रोखणं आणि अर्थव्यवस्थेवर अनावश्यक ताण येऊ न देणं. आज हा राष्ट्रीय गुंतवणूक निधी ७० हून अधिक देशांतील हजारो कंपन्यांमध्ये गुंतलेला आहे.

सुरुवातीच्या काळात निधीची वाढ ही तेलातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे होत होती. मात्र हळूहळू चित्र बदलत गेलं. आता या निधीचा मोठा भाग गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यावर आधारित आहे. त्यामुळे भविष्यात तेल उत्पादन कमी झालं तरी निधीवर त्याचा मोठा परिणाम होणार नाही, अशी रचना नॉर्वेने केली आहे.

नॉर्वे सरकारने या निधीच्या वापरावरही कठोर नियम ठेवले आहेत. दरवर्षी या निधीतील फक्त सुमारे ३ टक्के रक्कम सरकारी बजेटसाठी वापरता येते. यामुळे मूळ निधी सुरक्षित राहतो आणि कोणत्याही सरकारला मनमानी खर्च करता येत नाही. हा नियम राजकीय बदलांपासून दूर ठेवण्यात आला आहे.

भविष्यात तेल संपेल, हे नॉर्वेला माहीत आहे. मात्र राष्ट्रीय गुंतवणूक निधीमुळे शिक्षण, आरोग्य सेवा, पेन्शन आणि सामाजिक योजनांसाठी पैसा कमी पडणार नाही. तेल संपलं तरी देशाची समृद्धी टिकून राहील, याची तयारी नॉर्वेने आधीच करून ठेवली आहे.

नॉर्वेचा हा अनुभव जगासाठी एक महत्त्वाचा धडा आहे. नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर, आर्थिक शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला, तर संपणारी साधनंसुद्धा कायमची आर्थिक ताकद निर्माण करू शकतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version