घरबिजनेसविदेशी बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचा दबदबा

विदेशी बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचा दबदबा

निर्यातीतून १.०८ लाख कोटींची कमाई

अमेरिकेचे वाढते टॅरिफ, जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि रुपयाच्या घसरणीचे आव्हान असतानाही भारतीय कंपन्यांनी निर्यातीच्या आघाडीवर दमदार कामगिरी केली आहे. वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये देशातील प्रमुख कंपन्यांनी परदेशी बाजारपेठेत आपला विस्तार वाढवत निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन कमावले. २० प्रमुख कंपन्यांची निर्यातीतून झालेली एकत्रित परकीय चलन कमाई तब्बल १,०८,२६९ कोटी रुपयांवर पोहोचली असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात २९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

या कंपन्यांमध्ये आयटीसी, मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, हिरो मोटोकॉर्प, डाबर, एशियन पेंट्स, पिडिलाइट इंडस्ट्रीज, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, व्होल्टास आणि युनायटेड स्पिरिट्स यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांनी निर्यातीतून मिळवलेले परकीय चलन आयातीवर झालेल्या खर्चापेक्षा अधिक ठेवण्यात यश मिळवले आहे. या काळात कच्चा माल, सुटे भाग आणि इतर घटकांच्या आयातीवर सुमारे १,०४,३६१ कोटी रुपये खर्च झाले. म्हणजेच निर्यात आणि आयातीतील फरक पाहता या कंपन्या एकत्रितपणे निव्वळ परकीय चलन मिळवणाऱ्या ठरल्या आहेत.
हे ही वाचा:
कृति सॅननची वादग्रस्त जाहिरात हटवली!

मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार

जगभरातील अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्सला स्थगिती

ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ला? माजी सीडीएस काय म्हणाले?

या कामगिरीत मारुती सुझुकीची भूमिका विशेष ठरली. कंपनीने वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये विक्रमी ४,४७,७७४ वाहनांची निर्यात केली. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या निर्यातीत ३४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सलग पाचव्या वर्षी भारतातील प्रवासी वाहनांच्या निर्यातीत मारुती सुझुकीने आघाडी कायम ठेवली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीवरही भर देण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय कंपन्यांच्या या कामगिरीमागे उत्पादन क्षमता वाढवण्यासोबतच देशांतर्गत पातळीवर कच्चा माल आणि सुट्या भागांचे उत्पादन वाढवण्याची रणनीतीही महत्त्वाची ठरली आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्थानिकीकरणाला चालना दिल्याने कंपन्यांना खर्च नियंत्रणात ठेवणे आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहणे शक्य झाले आहे.

जागतिक व्यापारातील आव्हाने अद्याप कायम असली तरी भारतीय कंपन्यांची वाढती निर्यात देशाच्या उद्योगक्षेत्रासाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांची परदेशातील मागणी वाढत असून, भारतीय कंपन्या केवळ देशांतर्गत बाजारपेठेपुरत्या मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेत आपली पकड मजबूत करत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version