पार्सल पाठवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्याची आणि बुकिंगसाठी लांबलचक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आता कमी होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच डोअर-टू-डोअर पार्सल सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून, या सुविधेमुळे ग्राहकांना घरातूनच सामान पाठवता येणार आहे. मोबाइल ॲपच्या माध्यमातून बुकिंग आणि ऑनलाइन पेमेंट करता येणार असल्याने सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यापारी आणि ऑनलाइन विक्रेत्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या सेवेसाठी रेल्वेकडून ‘रेल पार्सल ॲप – घर से घर तक’ विकसित करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि पुणे या आठ शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्याची तयारी आहे.
या सेवेमध्ये पार्सल घरातून उचलण्यापासून ते ग्राहकाने दिलेल्या अंतिम पत्त्यावर पोहोचवण्यापर्यंतची जबाबदारी रेल्वे आणि लॉजिस्टिक्स कंपन्या संयुक्तपणे सांभाळतील. ग्राहकाने ॲपवर बुकिंग केल्यानंतर लॉजिस्टिक्स कंपनी घरातून पार्सल उचलून संबंधित रेल्वे स्टेशनवर पोहोचवेल. त्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून सामानाची दुसऱ्या शहरात वाहतूक केली जाईल. गंतव्य शहरातील स्टेशनवर पार्सल पोहोचल्यानंतर लॉजिस्टिक्स कंपनी ते संबंधित पत्त्यावर पोहोचवेल. गरजेनुसार पॅकेजिंगची सुविधाही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होईल.
हे ही वाचा:
पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी प्रियांका गांधींना ७ कोटी दिले?
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर स्थिर
सुकामेव्याच्या दरात किलोमागे ६०० रुपयांपर्यंत वाढ
सरकार आवडत नसेल तर निवडणूक लढवा!
रेल्वेच्या नियमांनुसार दुचाकी, फर्निचर, घरगुती उपकरणे आणि व्यावसायिक वस्तू पार्सल म्हणून पाठवता येतात. त्यामुळे घर बदलणाऱ्या नागरिकांसह लहान व्यापारी आणि ऑनलाइन विक्रेत्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरू शकते. ट्रेन सुटण्याच्या १५ दिवस आधीपासून बुकिंग करता येणार असून, ट्रेन रवाना होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल.
बुकिंग रद्द करण्याबाबतही नियम निश्चित करण्यात आले आहेत. पार्सल घरातून उचलण्यापूर्वी बुकिंग रद्द केल्यास रेल्वेच्या मालवाहतूक शुल्काचा परतावा मिळेल; मात्र त्यातून १० रुपये शुल्क वजा केले जाईल. घरातून पार्सल उचलणे आणि अंतिम पत्त्यावर पोहोचवण्यासाठी लॉजिस्टिक्स कंपनीला दिलेल्या शुल्काचा परतावा त्या कंपनीच्या नियमांनुसार मिळेल. या सुविधेमुळे पार्सल वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा असून, सेवेची प्रारंभ तारीख आणि शुल्काबाबत रेल्वेच्या अधिकृत घोषणेकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
