भारताच्या खाद्यतेल आयातीचा खर्च विक्रमी पातळीवर पोहोचला असून, देशाचे आयात बिल तब्बल २ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमती, कमी झालेले उत्पादन आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे भारताला आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या तेल वर्षात भारताने सुमारे २१ अब्ज डॉलरचे खाद्यतेल आयात केले. मागील वर्षाच्या तुलनेत आयात खर्चात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, भारत आपल्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी जवळपास ६० टक्के गरज आयातीच्या माध्यमातून पूर्ण करतो.
भारत प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेल, अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेल, तर रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल तेल आयात करतो. मात्र, जागतिक बाजारातील अस्थिरता, रशिया-युक्रेन युद्ध, कमी उत्पादन आणि जैवइंधन निर्मितीसाठी खाद्यतेलाचा वाढता वापर यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इंडोनेशिया आणि मलेशियातील उत्पादनातील अडचणींमुळेही बाजारात दबाव निर्माण झाला आहे. त्यातच रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयातीचा खर्च आणखी वाढला आहे.
हे ही वाचा:
कच्च्या तेलाच्या दरात ९० दिवसांतील नीचांकी घसरण
पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस
पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?
मेरठमधून दहशतवादी कनेक्शन असलेल्या उजैदला अटक
या परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांच्या खिशावर होत आहे. खाद्यतेलाच्या किरकोळ किमतींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १३ ते १६ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. मोहरी आणि शेंगदाणा तेलाचे दर प्रतिलिटर २१० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत तेलबिया उत्पादनातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोहरीच्या पेरणी क्षेत्रात घट झाली असून, गुजरातमध्ये कमी पावसामुळे शेंगदाणा उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे आव्हान अधिक गंभीर बनले आहे.
खाद्यतेलाच्या वाढत्या आयात बिलावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताला देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. मोहरी, सोयाबीन आणि शेंगदाणा उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. देशांतर्गत पामतेल उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनेही विशेष योजना आखली आहे. मात्र, गेल्या दोन दशकांत खाद्यतेल आयातीचे प्रमाण २.८ पट, तर आयातीवरील खर्च तब्बल १५ पट वाढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाची महागाई हा केवळ ग्राहकांच्या बजेटचा प्रश्न नसून देशाच्या व्यापार तुटीवर आणि परकीय चलन साठ्यावर परिणाम करणारा गंभीर आर्थिक मुद्दा बनला आहे.
