भारताच्या परकीय चलनसाठ्यात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली असून, देशाचा परकीय चलनसाठा ७०१ अब्ज डॉलरच्या खाली आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा ४.४४३ अब्ज डॉलरने घसरून ७००.९० अब्ज डॉलरवर आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या आठवड्यातही परकीय चलनसाठ्यात तब्बल १४.२१ अब्ज डॉलरची घट झाली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात झालेल्या या घसरणीमुळे भारताचा परकीय चलनसाठा गेल्या १६ आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
या घसरणीमागे सोन्याच्या साठ्याच्या मूल्यामध्ये झालेली मोठी घट हे प्रमुख कारण ठरले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, आठवडाभरात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ४.०९५ अब्ज डॉलरने कमी होऊन ९४.५१९ अब्ज डॉलरवर आले आहे. याशिवाय, परकीय चलन मालमत्तेतही २६६ दशलक्ष डॉलरची घट झाली असून हा साठा ५८३.१८६ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. विशेष आहरण हक्क म्हणजेच एसडीआरमध्ये ६७ दशलक्ष डॉलरची घट झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भारताच्या राखीव स्थानात १५ दशलक्ष डॉलरची घसरण नोंदवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’
आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी
ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी
दरम्यान, भारताचा परकीय चलनसाठा ४ सप्टेंबर २०२६ रोजी ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता. त्यावेळी देशाचा परकीय चलनसाठा ७८५.७०६ अब्ज डॉलर इतका होता. मात्र, त्यानंतर साठ्यात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. सध्याचा साठा ऐतिहासिक उच्चांकापेक्षा जवळपास ८४.८ अब्ज डॉलरने कमी झाला आहे. सोन्याच्या किमतीतील बदल आणि परकीय चलन मालमत्तेच्या मूल्यांकनातील चढ-उतार यांचाही या आकडेवारीवर परिणाम होत असतो.
परकीय चलनसाठा हा देशाच्या आर्थिक स्थैर्याचा महत्त्वाचा आधार मानला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असलेली आयात, कच्च्या तेलाची खरेदी, परकीय कर्जाची परतफेड आणि रुपयाच्या विनिमय दरातील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी आरबीआय या साठ्याचा वापर करते. त्यामुळे सलग दोन आठवड्यांतील घसरण आर्थिक क्षेत्रासाठी लक्षवेधी ठरली आहे. मात्र, ७०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक असलेला साठा भारताला जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे संरक्षण देत आहे.
