घरगुती एलपीजी सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२६पासून अनुदानित दरात एलपीजी रिफिल घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. सबसिडीचा लाभ केवळ पात्र ग्राहकांनाच मिळावा, बनावट किंवा दुबार कनेक्शनला आळा बसावा आणि घरगुती सिलिंडरच्या गैरवापराला प्रतिबंध व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण न केलेल्या एलपीजी ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
सरकारी माहितीनुसार, देशातील २७.४३ कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांपैकी सुमारे ८९.९ टक्के ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे या ग्राहकांना पुन्हा प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या ग्राहकांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना डिलिव्हरी कर्मचाऱ्यामार्फत, संबंधित गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा तेल विपणन कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. इंडेनसाठी IndianOil ONE, भारतगॅससाठी HelloBPCL आणि एचपी गॅससाठी HP PAY या अॅपचा वापर करता येणार आहे.
दरम्यान, बायोमेट्रिक प्रमाणीकरण न केलेल्या ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन बंद होणार नाही. मात्र, सबसिडीचा लाभ मिळणार नसून सिलिंडर लागू बाजारभावाने घ्यावा लागू शकतो. त्यामुळे सबसिडी सुरू ठेवायची असल्यास ग्राहकांनी वेळेत आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. प्रमाणीकरणाबाबत अडचण आल्यास ग्राहक संबंधित गॅस वितरकाशी संपर्क साधू शकतात किंवा १८०० २३३३ ५५५ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती घेऊ शकतात.
