सर्वसामान्य कुटुंबांसाठी महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. घरात रोज तयार होणाऱ्या जेवणाचा खर्च वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. क्रिसिलच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ मध्ये शाकाहारी थाळी तयार करण्याचा खर्च गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढला आहे, तर मांसाहारी थाळीचा खर्च ६ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शाकाहारी थाळीसाठी सरासरी २८.१० रुपये खर्च येत होता. आता हाच खर्च ३०.८० रुपयांवर पोहोचला आहे. मांसाहारी थाळीचा खर्च ५६ रुपयांवरून ५९.५० रुपयांपर्यंत वाढला आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये शाकाहारी थाळी ४ टक्के, तर मांसाहारी थाळी ३ टक्क्यांनी महागली आहे.
या दरवाढीमागे कांद्याच्या किमतीतील मोठी वाढ हे प्रमुख कारण ठरले आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर वर्षभराच्या तुलनेत तब्बल ८९ टक्क्यांनी वाढून प्रतिकिलो ५३ रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षी याच काळात कांदा २८ रुपये किलो दराने मिळत होता. म्हणजेच वर्षभरात कांद्याच्या दरात प्रतिकिलो २५ रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याच्या रब्बी हंगामातील उत्पादनात ५ ते ६ टक्क्यांची घट झाल्यामुळे बाजारातील साठा कमी झाला. त्यातच जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ४० टक्के कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या लागवडीला विलंब झाला आणि नवीन कांद्याची बाजारातील आवक लांबणीवर पडली. परिणामी, केवळ एका महिन्यात कांद्याच्या दरात ३४ टक्क्यांची वाढ झाली.
हे ही वाचा:
१० ऑक्टोबरच्या कॉकरोचच्या आंदोलनाला परवानगी नाकारली
रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयचा डॉलर स्वॅपचा आधार
ट्रम्प यांचा भारतीय आयटी कंपन्यांना झटका
गोदावरी नदीकाठावरील अनधिकृत मजार हटवली
कांद्यासोबत खाद्यतेल, तांदूळ आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींनीही घरगुती बजेटवर दबाव वाढवला आहे. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमती १२ टक्क्यांनी, तांदळाच्या किमती ८ टक्क्यांनी, तर घरगुती एलपीजीच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाम तेलावरील आयात शुल्क कमी करूनही जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. तसेच भात लागवडीचे क्षेत्र कमी होणे आणि उत्पादन घटण्याचा अंदाज यामुळे तांदळाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. या सर्व वस्तूंच्या दरवाढीचा एकत्रित परिणाम थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे.
आगामी सणासुदीच्या काळात कांद्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सणांमुळे मागणी वाढल्यास आणि बाजारातील आवक कमी राहिल्यास कांद्याचे दर चढे राहण्याचा अंदाज क्रिसिलने व्यक्त केला आहे. मात्र, ऑक्टोबरच्या अखेरीस खरीप हंगामातील नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्यानंतर दर हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत महागाईचा भार सर्वसामान्य कुटुंबांना सहन करावा लागू शकतो. विशेषतः मर्यादित उत्पन्नात घरखर्च भागवणाऱ्या कुटुंबांसाठी ही दरवाढ चिंताजनक ठरत आहे.
