घरबिजनेसफोक्सवॅगन ५० हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

फोक्सवॅगन ५० हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

खर्च कमी करण्यासाठी कंपनीचा ‘फ्युचर प्लॅन २०३०’

जर्मनीची आघाडीची वाहननिर्मिती कंपनी फोक्सवॅगनने खर्च कमी करण्यासाठी मोठ्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या ‘फ्युचर प्लॅन २०३०’ अंतर्गत जगभरातील सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. याआधी झालेल्या कर्मचारी कपातीसह कंपनीतील जवळपास १ लाख रोजगारांवर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहनांच्या उत्पादनात घट करून उपलब्ध उत्पादन क्षमतेचा अधिक चांगला वापर करणे, तसेच कंपनीवरील वाढता खर्च कमी करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

फोक्सवॅगन आपल्या वाहनांच्या मॉडेल्सची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे. २०३५ पर्यंत वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास ५० टक्के कपात करण्याची योजना कंपनीने आखली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या विविध प्रकार आणि कॉन्फिगरेशनची संख्या सुमारे ७५ टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. सध्या कंपनीकडे दरवर्षी गरजेपेक्षा सुमारे ५ लाख अधिक वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत ही क्षमता जास्त असल्याने कंपनीवर आर्थिक भार वाढत आहे. जर्मनीतील काही प्रमुख कारखान्यांनाही भविष्यात पुरेसे उत्पादन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा:
भारतीय वाहन उद्योगाची वेगवान घोडदौड कायम

महापुरानंतर भारताकडे कोणतीही भरपाई मागितलेली नाही

७६९ कोटींच्या दारुगोळा खरेदी घोटाळ्यानंतर एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

GSLV-F17 चे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे कौतुक

फोक्सवॅगनसमोरील आर्थिक अडचणी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे कंपनीवर दरवर्षी सुमारे ५ अब्ज युरोचा अतिरिक्त भार पडत आहे. दुसरीकडे चीनमधील वाहनांची मागणी कमी झाली असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारातही स्पर्धा तीव्र झाली आहे. या परिस्थितीचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत फोक्सवॅगनचा ऑपरेटिंग नफा ११.६ टक्क्यांनी घसरून ५.९ अब्ज युरोवर आला. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा कठोर निर्णय घेतला आहे. मात्र, कर्मचारी कपातीमुळे कामगारांमध्ये नाराजी असून, कंपनीच्या पुनर्रचनेचा सर्वाधिक भार कर्मचाऱ्यांवर पडू नये, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version