सणासुदीचा काळ आणि लग्नसराईमुळे देशातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह वाढत असतानाच आगामी महिन्यांत महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोव्हेंबरच्या मासिक आर्थिक आढावा अहवालात याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. सण आणि विवाह सोहळ्यांमुळे अन्नपदार्थांसह बिगरखाद्य वस्तूंच्या मागणीत वाढ होत आहे. मागणी वाढल्याने आगामी काळात किरकोळ महागाईचा दर चढा राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापरातील वस्तूंच्या खरेदीचा बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो.
अर्थ मंत्रालयाच्या मते, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या मजबूत असून डिसेंबर तिमाहीत आर्थिक घडामोडींचा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. वस्तूंची वाहतूक, करसंकलन, ऊर्जेचा वापर आणि मालवाहतुकीत वाढ होत असल्याचे विविध आर्थिक निर्देशक दर्शवत आहेत. मात्र, पश्चिम आशियातील संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीला असलेला धोका आणि जागतिक व्यापार धोरणांमधील अनिश्चितता ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च आणि समुद्री मालवाहतुकीचे दर अस्थिर राहू शकतात.
हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्याला पुन्हा मोठा धक्का
आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी
ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी
भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात देशातील किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर पोहोचला होता. दोन वर्षांनंतर प्रथमच महागाईने रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित सहा टक्क्यांच्या उच्च मर्यादेला ओलांडले आहे. अन्नधान्याच्या किमतींमधील वाढ आणि प्रतिकूल आधारभूत परिणाम यामुळे महागाईचा दर वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या महागाईच्या आकडेवारीवरही या आधारभूत परिणामाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यातच हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य एल निनोचा कृषी उत्पादनावर परिणाम झाल्यास अन्नधान्याच्या किमती आणखी वाढू शकतात.
मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आल्याने भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि रुपयाच्या मूल्यातील मजबुतीमुळे आयातीतून निर्माण होणारा महागाईचा दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते. १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत देशाचा परकीय चलनसाठा ७०५.३ अब्ज डॉलरवर होता, जो जवळपास दहा महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेकडे आव्हानांचा सामना करण्याची क्षमता असली, तरी वाढती मागणी, जागतिक संघर्ष आणि हवामानातील बदल यांमुळे आगामी काळात महागाई नियंत्रणात ठेवणे सरकार आणि रिझर्व्ह बँकेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
