घरक्राईमनामादहिसरमधील ज्येष्ठ नागरिकाची १.१२ कोटींची 'डिजिटल अटक' फसवणूक

दहिसरमधील ज्येष्ठ नागरिकाची १.१२ कोटींची ‘डिजिटल अटक’ फसवणूक

आयआयटीयनसह बँकेच्या मॅनेजरला अटक

दहिसर येथील एका ६८ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, यामध्ये आयआयटी दिल्लीचा माजी विद्यार्थी (वेब डेव्हलपर) आणि एका खासगी बँकेच्या ऑपरेशन्स मॅनेजरचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
दोन आठवडे चालला अटकेचा बनाव
जुलै आणि ऑगस्ट दरम्यान तक्रारदाराला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. त्याने दूरसंचार प्राधिकरणाचा (DoT) अधिकारी असल्याचे भासवून, ‘तुमच्या ओळखपत्रांचा गैरवापर झाला असून दिल्लीत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे,’ अशी बतावणी केली. त्यानंतर ‘विजय खन्ना’ नावाच्या एका बनावट पोलीस अधिकाऱ्याने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरून तक्रारदाराशी संपर्क साधला. पोलिसांचा लोगो, गणवेश आणि ‘भारताचे सर्वोच्च न्यायालय’ असा खोटा उल्लेख असलेली बनावट कायदेशीर कागदपत्रे पाठवून वृद्धाला दहशतीखाली ठेवण्यात आले.
कुटुंबाला सांगितल्यास सर्वांना अटक करण्याची धमकी देऊन, वृद्धाला दोन आठवडे घरातच ‘डिजिटल अरेस्ट’ ठेवण्यात आले होते. यादरम्यान दर दोन तासांनी लोकेशन मागवून, त्यांची बँक खाती आणि मुदत ठेवी (FD) मोडून तब्बल १.१२ कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करून घेण्यात आले. अखेर ज्येष्ठ नागरिकाच्या मुलीला हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबाने सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली.
हे ही वाचा:
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची नोटीस

“मोदींच्या नेतृत्वाने भारताला जागतिक शक्तीत बदलले”

“इतरांना जे करायला दशकं लागली, ते भारताने कमी काळात करून दाखवले”

मोदींच्या वाढदिवशी परदेशी राजनयिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
आंतरराज्यीय टोळीचा असा लागला सुगावा
उत्तर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर डीसीपी बजरंग बनसोडे यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ निरीक्षक प्रमोद कांबळे आणि निरीक्षक सुनील लोखंडे यांच्या पथकाने आर्थिक व्यवहारांचा माग काढला.
तपासात उघड झालेली माहिती:
* लुटलेल्या रकमेचा मोठा हिस्सा एका सोन्याचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या खात्यात जमा झाला होता.
* त्या खात्याशी लिंक असलेली सिम कार्डे तारिक मोमिन नावाच्या आरोपीकडे होती, जो बनावट खाती (म्यूल अकाउंट्स) उघडण्याचे काम करत होता.
* सोन्याच्या कंपनीचा संचालक राकेश जैन यालाही अटक करण्यात आली. जैनच्या नावाचे सिम असलेला फोन घेऊन आरोपी चिंतन देसाई मुंबईहून दिल्ली आणि तेथून उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे गेला होता. बिजनौरमधूनच रोख रक्कम काढणे व इतर तस्करांच्या खात्यात पैसे फिरवण्याचे काम झाले.
* या गुन्ह्यात सामील असलेला आरोपी गोहेल हा आयआयटी दिल्लीमधून पदवीधर असून वेब डेव्हलपर आहे. २०२१ मध्येही त्याच्यावर वांद्रे पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी या प्रकरणात तारिक मोमिन, राकेश जैन, चिंतन देसाई, त्यागी, गोहेल आणि अजय शर्मा या सहाही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अवैध निधी स्वीकारणे, बनावट खाती हाताळणे आणि पैशांची विल्हेवाट लावणे यामध्ये या सर्वांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version