दिल्लीतील विविध आंदोलनांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २ ऑक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे २५ एफआयआर नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, पोलिसांशी झटापट, सरकारी कामात अडथळा आणणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांची नावेही काही तक्रारींमध्ये समाविष्ट आहेत.
६ ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चाला अधिकृत परवानगी घेतली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि इतर काही नेते आकाशवाणी भवनाच्या परिसरात दाखल झाले आणि त्यांनी तेथे आंदोलन सुरू ठेवले. परवानगीशिवाय सरकारी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना परिसर रिकामा करण्यास सांगितले; मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत तेथून हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून नेत्यांसह इतर आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीच्या अन्य खासदारांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.
८ ऑक्टोबर रोजीच्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी तीन एफआयआर नोंदवल्याचे वृत्त आले होते. या तक्रारींमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा, सरकारी कामात अडथळा आणल्याचा, धक्काबुक्की केल्याचा आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आंदोलनादरम्यान नेमकी कोणाची भूमिका होती, हे निश्चित करण्यासाठी पोलिस मोबाइलवर चित्रित केलेल्या व्हिडिओंची तपासणी करत असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, दिल्लीतील विविध आंदोलनांप्रकरणी नोंदवलेल्या सुमारे २५ एफआयआरची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची नावे यातील काही प्रकरणांत समाविष्ट करण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
गोदावरी नदीकाठावरील अनधिकृत मजार हटवली
फेसबुकवरील कमेंटमुळे श्रीलंकन हिंदू तरुणाला सौदीत मृत्युदंड
काँग्रेसची डबल ढोलकी! फडणवीसांनी जुना व्हिडिओ दाखवत घेरले
स्मित माछर यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर
१० ऑक्टोबरच्या आंदोलनाबाबत पोलिसांचा इशारा
१० ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही इशारा दिला आहे. नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या निर्बंधांच्या काळात जंतरमंतरसह इतर ठिकाणी परवानगीशिवाय जमाव जमल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
