हरियाणातील पंचकुला येथील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ वर्षांच्या तिसरीतील विद्यार्थ्याने सहा वर्षांच्या केजीमधील चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला चंदीगडमधील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २८ ऑक्टोबर रोजी संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये हा प्रकार घडला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या घटनेचे गांभीर्य उघड झाले असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार, संबंधित विद्यार्थ्याने आधी मुलीचे केस पकडून तिचे डोके बाकावर आपटले. त्यानंतर तिला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने दगड, वीट आणि फुलांच्या कुंडीने तिच्या डोक्यावर वार केले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतरही त्याने हल्ला सुरूच ठेवल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी पीजीआयमध्ये हलवण्यात आले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पत्रकार निधी रझदान यांच्याशी थाटणार संसार!
भारताच्या नाविकला बळ देणारा एनव्हीएस-०३
लाडावलेल्या राजपुत्राला खुश करण्यासाठी प्रतिकात्मक संसद
हवाई दलाचे प्रमुख आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारली सूत्रे
दरम्यान, मुलीला घेण्यासाठी कुटुंबीय शाळेत पोहोचले असता ती रक्ताच्या थारोळ्यात वर्गात पडलेली आढळली. मुलीने शिक्षकांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी दिली आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी शाळेतील काही शिक्षक शासकीय कामासाठी बाहेर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांवर देखरेख कोण करत होते आणि इतका गंभीर प्रकार घडेपर्यंत कोणालाही कसे समजले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधित विद्यार्थ्याच्या वर्तनाचे आणि मानसिक स्थितीचे मूल्यमापन केले जात आहे. हरियाणा सरकारनेही चौकशी समिती स्थापन केली असून बालहक्क संरक्षण आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. मात्र, या घटनेने शाळांमधील सुरक्षाव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून चालणार नाही, तर शिक्षकांची सतत देखरेख आणि प्रभावी सुरक्षा यंत्रणा असणेही तितकेच आवश्यक असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
