श्रीहरिकोटा येथून भारताने जीएसएलव्ही-एफ१८ रॉकेटद्वारे एनव्हीएस-०३ हा नवीन पिढीचा उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडला आहे. ‘नॉटी बॉय’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जीएसएलव्ही रॉकेटने आपले २० वे यशस्वी उड्डाण पूर्ण केले आहे. हा उपग्रह देशाची स्वतःची स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली नाविक अधिक सक्षम आणि प्रगत करण्याच्या उद्देशाने प्रक्षेपित करण्यात आला आहे. याचा फायदा देशातील नागरिकांना आहेच, शिवाय देशाची सुरक्षा अधिक खंबीर होणार आहे. या उपग्रहात यंदा पहिल्यांदाच भारतात निर्मिती करण्यात आलेल्या अणू घड्याळाचा आपण वापर केला आहे. यापूर्वी वापरलेल्या विदेशी अणू घड्याळाच्या बिघाडामुळे भारताचे अनेक उपग्रह निकामी झाल्यानंतर हे पाऊल उचलणे भारताला भाग होते. ते आपण यशस्वीपणे उचलले आहे.
भारत हा अवकाश संशोधन क्षेत्रातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. आपण या क्षेत्रात पावले पुढे टाकत आहोत, तशा काही अतिप्रचंड समस्या आपल्यासमोर उभ्या ठाकत आहेत. विशेषतः या उपग्रह किंवा प्रक्षेपकांसाठी विदेशातून आपण जी उपकरणे आयात करतो, त्यामुळे अनेकदा आपण अडचणीत येत आहोत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी मजल मारताना विदेशावर असलेले किंचित अवलंबित्वही कसे धोकादायक ठरू शकते याचा अनुभव आपण पावला पावलावर घेत आहोत. शंभर टक्के आत्मनिर्भरता हाच त्यावर असलेला उपाय आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रात प्रभाव निर्माण करणे आणि तो टिकवणे या दोन्ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत. त्यासाठी सातत्याने तज्ज्ञ मनुष्यबळ आणि संसाधनांमध्ये अतिप्रचंड गुंतवणूक करावी लागते. तरच तुमचे साम्राज्य टिकू शकते. अणू घड्याळांनीही हा धडा आपल्याला पुन्हा एकदा दिला आहे. हा उपग्रहाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण उपग्रहांसाठी स्वित्झर्लंडमधून रुबिडियम अणू घड्याळांची आयात करत होतो. २०१६ पासून या घड्याळांनी दगा द्यायला सुरुवात केली, त्यामुळे भारताच्या ‘नाविक’ / ‘आयआरएनएसएस’ मालिकेतील एकूण ७ उपग्रहांना मोठा फटका बसला होता. हे षडयंत्र नसावे, कारण या घड्याळांबाबत जो अनुभव भारताला आला तोच युरोपलाही आला. षडयंत्र असो वा नसो, आपल्या लक्षात आले की अणू घड्याळांच्या स्वदेशी निर्मितीशिवाय आपले अडणार आहे. अणू घड्याळाची किंमत एकूण उपग्रहाच्या दोन ते तीन टक्के असते, परंतु हे घड्याळ बंद पडले तर उपग्रहाच्या कामकाजावर अत्यंत विपरीत परिणाम होतो.
हे ही वाचा:
बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का
मनीषा भानवालाची ऐतिहासिक सुवर्णभरारी!
बँक ऑफ बडोदाची दुसऱ्या तिमाहीत नफा ३५.८ टक्क्यांनी वाढला
२०१६ मध्ये ‘आयआरएनएसएस – १ए’ या मालिकेतील पहिल्याच उपग्रहावरील तीन स्विस अणू घड्याळे एकापाठोपाठ एक पूर्णपणे निकामी झाली, ज्यामुळे हा उपग्रह मुख्य नेव्हिगेशन सेवेसाठी निरुपयोगी ठरला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अन्य इतर ६ उपग्रहांमध्ये हीच समस्या उद्भवली. प्रत्येकी किमान एक किंवा दोन अणू घड्याळांनी काम करणे बंद केले. जरी या उर्वरित उपग्रहांना बॅकअप घड्याळांमुळे काही काळ चालू ठेवण्यात आले, तरी आयात केलेल्या घड्याळांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक त्रुटीमुळे सर्व ७ उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर आणि अचूकतेवर परिणाम झाला होता.
‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या लष्करी मोहिमांच्या काळात उपग्रहांच्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतील आव्हाने आणि समस्या प्रकर्षाने समोर आल्या होत्या. इस्रोला परदेशी घड्याळांचा वापर थांबवून स्वतःचे स्वदेशी अणू घड्याळ विकसित करणे भाग पडले. अहमदाबादच्या ‘स्पेस अप्लिकेशन सेंटर’मध्ये हे अणू घड्याळ विकसित करून भारताने अंतराळ क्षेत्रात स्वावलंबनाच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकले आहे. लष्करी आणि हवाई दलाच्या हालचालीत रिअल-टाइम लोकेशनचे महत्त्व प्रचंड आहे. तुम्हाला लक्ष्यावर अचूक मारा करायचा असेल तर तुमच्याकडे रिअल-टाइम लोकेशन असावेच लागते. आपण ओला, उबेर किंवा रॅपिडो बुक केल्यावर कॅब आपल्यापासून किती अंतरावर आहे आणि ती सध्या कोणत्या रस्त्यावर आहे, हे आपण मोबाईलवर लाईव्ह पाहतो, यालाच रिअल-टाइम लोकेशन म्हणतात. गुगल मॅप्सवर नेव्हिगेशन करताना ट्रॅफिकची लाइव्ह स्थिती आणि आपली गाडी सध्या कुठे आहे हे समजते.
अंतराळातील उपग्रहांचा वेग ताशी हजारो किलोमीटर असतो, त्यामुळे तिथे वेळेची अचूकता नॅनोसेकंदच्या पातळीवर हवी असते. जर उपग्रहावरील घड्याळात केवळ एक सेकंदाचा दशलक्षांश भाग जरी फरक पडला, तरी जमिनीवरील लोकेशन तब्बल ३०० मीटर ते काही किलोमीटरने चुकू शकते, ज्यामुळे क्षेपणास्त्र, तोफा किंवा ड्रोनचे लक्ष्य भेदन चुकू शकते. दारूगोळा लष्करी लक्ष्याऐवजी नागरी वस्तीवर पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
आपण वापरतो ते सामान्य घड्याळ दिवसाला काही सेकंद वा मिनिट पुढे सरकते. उपग्रहांसाठी ते उपयोगी नसते. म्हणूनच, उपग्रहांमध्ये अत्यंत अचूक वेळ मोजणारी रुबिडियम किंवा सीझियमसारखी ‘अणू घड्याळे’ बसवलेली असतात. ही घड्याळे लाखो वर्षांत एक सेकंदाचाही फरक पडू देत नाहीत, ज्यामुळे अचूक टाइम-सिंक्रोनायझेशन राहते आणि अचूक रिअल-टाइम लोकेशन मिळणे शक्य होते.
भारतीय हवाई दल किंवा लष्कराने शत्रूच्या सीमेपलीकडच्या एखाद्या गुप्त दहशतवादी तळावर क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्याची योजना आखली आहे. अणू घड्याळांच्या अचूक वेळेच्या सहाय्याने ‘नाविक’ किंवा इतर नेव्हिगेशन सिस्टीम त्या दहशतवादी तळाचे अचूक रिअल-टाइम कोऑर्डिनेट्स मार्गदर्शन यंत्रणेला पुरवते. उपग्रहाने पुरवलेल्या अचूक डेटा आणि अणू घड्याळामुळे मिळालेल्या अचूक वेळेच्या मेळाामुळे, क्षेपणास्त्र ठरवलेल्या लक्ष्यावर अगदी मीटर किंवा सेंटीमीटरच्या अचूकतेने धडकते. ‘एनव्हीएस-०३’ या उपग्रहात पहिल्यांदाच एल-१ सिग्नलचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या मोबाईल, कार आणि इतर उपकरणांमध्ये नाविक सिस्टीम वापरणे खूप सोपे आणि सुटसुटीत होणार आहे. जगभरातील बहुतांश नागरी जीपीएस उपकरणे, मोबाईल फोन्स, स्मार्टवॉचेस आणि कार नेव्हिगेशन सिस्टीम या प्रामुख्याने याच एल-१ फ्रिक्वेन्सीचा वापर करून लोकेशन डेटा मिळवतात.
भारताच्या ‘नाविक’ प्रणालीच्या सुरुवातीच्या उपग्रहांच्या मालिकेत केवळ एल-५ आणि एस बँडच्या सिग्नलचाच वापर केला जात होता. भारताच्या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीत ‘एनव्हीएस-०१’ उपग्रहापासून पहिल्यांदा एल-१ सिग्नलचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आता ‘एनव्हीएस-०३’ उपग्रहातही एल-१ सिग्नलचा वापर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी नाविक प्रणाली केवळ एल-५ आणि एस बँडवर चालत असल्याने, सामान्य मोबाईल फोन्समध्ये नाविक सिग्नल मिळवण्यासाठी विशेष चिपसेट (हार्डवेअर) बसवावे लागत होते. जगातील बहुतांश ग्राहक उपकरणे एल-१ सिग्नल स्वीकारण्यासाठी डिझाइन केलेली असतात. त्यामुळे नाविक उपग्रहांवर एल-१ सिग्नल उपलब्ध झाल्याने आता सामान्य स्मार्टफोन्समध्ये कोणत्याही अतिरिक्त चिपसेटशिवाय थेट ‘नाविक’चे लोकेशन मिळवणे सोपे झाले आहे.
एल-१ आणि एल-५ हे दोन्ही फ्रिक्वेन्सी बँड एकत्र वापरल्याने वातावरणातील अडथळ्यांमुळे सिग्नलमध्ये होणाऱ्या त्रुटी दूर होतात, ज्यामुळे लोकेशनची अचूकता अधिक वाढते. अमेरिकेची जीपीएस आणि युरोपच्या गॅलिलिओ यांसारख्या जागतिक नेव्हिगेशन सिस्टीमही हा सिग्नल वापरतात. त्यामुळे भारतीय ‘नाविक’ सिस्टीम इतर आंतरराष्ट्रीय सिस्टीमसोबत सहजतेने ताळमेळ राखू शकते. ‘एनव्हीएस-०३’ उपग्रहामुळे भारत आपल्या भौगोलिक सीमेभोवती सुमारे १५०० किलोमीटरच्या परिसरात या प्रणालीद्वारे अत्यंत अचूकपणे हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. परदेशी नेव्हिगेशन सिस्टीमवर अवलंबून नसल्यामुळे, पाकिस्तानच्या सीमेवर किंवा काश्मीर खोऱ्यात भारताची सुरक्षा यंत्रणा अधिक भेदक आणि स्वतंत्र झाली आहे. चीन स्वतःच्या ‘बेदौ’ नेव्हिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून आशिया, हिंद महासागर आणि दक्षिण आशियाई क्षेत्रात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत असताना आपण या उपग्रहाच्या माध्यमातून चीनलाही उत्तर दिले आहे.
‘नाविक’ हा अमेरिकेची जीपीएस आणि रशियाची ग्लोनास याव्यतिरिक्त एक विश्वासार्ह आणि उच्च-अचूकता असलेला पर्याय बनली आहे. या उपग्रहामुळे भारताची इस्रो (ISRO) ही संस्था जागतिक स्तरावर अत्यंत किफायतशीर, प्रगत आणि अचूक अंतराळ तंत्रज्ञान पुरवणारी महाशक्ती म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. जागतिक स्तरावर नेव्हिगेशन तंत्रज्ञानात भारताचा दबदबा आणखी वाढला आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
