घरक्राईमनामामुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला

मुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला

कल्याणहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधील घटना

- Advertisement -

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमधील वाद, हाणामाऱ्या आणि हिंसक घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीटच्या किरकोळ वादातून सुरू होणारे भांडण आता थेट हल्ल्यांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच मध्य रेल्वेवरील कल्याण-सीएसएमटी फास्ट लोकलच्या महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात एका महिलेने सहप्रवाशींवर पेपर स्प्रे फवारल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे डब्यातील अनेक महिलांना डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागली. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी कल्याणहून ८.३३ वाजता सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमध्ये घडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज काही महिला प्रवासी डोंबिवलीहून ‘डाऊन’ प्रवास करून कल्याणला येतात आणि त्याच लोकलने सीएसएमटीकडे परत जात महिलांच्या डब्यात जागा आधीच निश्चित करतात. त्यामुळे कल्याण स्थानकावरून रांगेत उभ्या असलेल्या महिला प्रवाशांना बसण्याची जागा मिळत नसल्याने या दोन गटांमध्ये वारंवार वाद होत असतात.

घटनेच्या दिवशीही कल्याण स्थानकावर लोकल आल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या महिलांनी डब्यात प्रवेश करून डोंबिवलीहून बसून आलेल्या चार महिलांना जागा सोडण्यास सांगितले. यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि डोंबिवली गटातील एका महिलेने आपल्या पिशवीतील पेपर स्प्रे काढून इतर महिला प्रवाशांच्या दिशेने फवारला.

अचानक पेपर स्प्रे फवारल्याने डब्यात एकच गोंधळ उडाला. अनेक महिलांना डोळ्यांची तीव्र जळजळ, श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागली. काही प्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. ठाणे स्थानकावर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते, मात्र तोपर्यंत लोकल पुढे निघून गेली.

लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचल्यानंतर सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) घटनास्थळी दाखल झाले. तक्रारदार महिला आणि पेपर स्प्रे फवारल्याचा आरोप असलेल्या महिलेला चौकशीसाठी जीआरपी कार्यालयात नेण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हे ही वाचा:

पाणबुड्यांचा ‘कर्दनकाळ’ भारताच्या ताफ्यात; MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर दाखल

हरित रेल्वे क्रांतीची नांदी; पहिली हायड्रोजन ट्रेन जींदहून सोनीपतसाठी रवाना

SIR मोहिमेदरम्यान महिला बीएलओशी गैरवर्तन; चार आरोपी गजाआड

पश्चिम बंगालमध्ये ट्रेनची कारला धडक; दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू

मुंबई लोकलमध्ये गेल्या काही दिवसांत सीटच्या वादातून हाणामाऱ्या, प्रवाशांवर हल्ले आणि हिंसक प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आता महिला डब्यात थेट पेपर स्प्रेचा वापर झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळेत महिलांच्या डब्यांमध्ये वाढत्या वादांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version