अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथील पुष्पा पार्कबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आल्याचे समजते. आरोपींच्या प्राथमिक चौकशीत टायगर श्रॉफ हा हल्लेखोरांचे सुरुवातीचे लक्ष्य नव्हता, तर मुंबईतील एका बड्या व्यक्तीची हत्या करण्याच्या उद्देशाने आरोपी शहरात आले होते, अशी माहिती समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, नियोजित लक्ष्यापर्यंत सहज पोहोचणे शक्य न झाल्याने आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टायगर श्रॉफ याला थेट जीवे मारण्याचा कट आखण्यात आल्याची माहितीही प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचे समजते. या प्रकरणातील आरोपींनी टायगर श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांच्या इन्स्टाग्राम खात्यांवरील रील्स तसेच सोशल मीडिया पोस्टचा आधार घेत अभिनेत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळा आणि ठिकाणांची माहिती मिळवून रेकी करण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
हे ही वाचा:
‘ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून बाहेर काढू’
दिवाळीपर्यंत कॉक्रोच आंदोलनाला ब्रेक
सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला
विशेष म्हणजे, टायगर श्रॉफसोबत नियमितपणे पोलिसांचा बंदोबस्त नसल्याचे आरोपींना त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या रील्समधून लक्षात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर अभिनेत्याला लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोशल मीडियावरील सार्वजनिक पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या हालचालींचा मागोवा घेऊन हल्ल्याचा कट रचला जाऊ शकतो, हा मुद्दाही या प्रकरणामुळे तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.
रविवार, १८ ऑक्टोबरच्या रात्री जुहू येथील पुष्पा पार्कबाहेर टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून अटक केली. हल्ल्यानंतर आरोपींनी मुंबईतून बाहेर पडताना वेगवेगळ्या मार्गांचा वापर केल्याचे तपासात समोर आले होते. आता प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे सांगितले जाणारे संभाव्य लक्ष्य, हल्ल्यामागील हेतू आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेली रेकी या बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, मुंबईतील अन्य कोणत्या बड्या व्यक्तीला लक्ष्य करण्याची योजना होती, त्यामागे कोणाचा हात आहे आणि टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा कट कोणी आखला, याबाबत अद्याप अधिकृतरीत्या स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे आरोपींच्या प्राथमिक चौकशीतील माहितीची पडताळणी आणि हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेणे, हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
