भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक फलंदाज शेफाली वर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकृत फटकार दिली आहे. तसेच तिच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट पॉइंट जमा करण्यात आला आहे. रविवारी रायपूर येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान ही घटना घडली.
झिम्बाब्वेच्या डावातील १२व्या षटकात श्री चरणीच्या गोलंदाजीवर शेफालीने मिड-ऑफ क्षेत्रात चिपो मुगेरी-तिरिपानोचा झेल सोडला. झेल सुटल्यामुळे निराश झालेल्या शेफालीने चेंडू जमिनीवर आपटला. तिचे हे वर्तन आंतरराष्ट्रीय सामन्यातील क्रिकेट साहित्याशी गैरवर्तन करण्याच्या प्रकारात मोडत असल्याने सामनाधिकाऱ्यांनी तिच्यावर आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम २.२ अंतर्गत लेव्हल-१ च्या उल्लंघनाचा आरोप ठेवला.
शेफालीने आपली चूक मान्य करत सामनाधिकारी जी. एस. लक्ष्मी यांनी ठोठावलेली शिक्षा स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता पडली नाही. गेल्या २४ महिन्यांतील हा तिचा पहिलाच शिस्तभंगाचा प्रकार आहे.
आयसीसीच्या नियमानुसार, लेव्हल-१ च्या उल्लंघनासाठी अधिकृत ताकीद देण्यापासून खेळाडूच्या सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्सची तरतूद आहे.
दरम्यान, याच सामन्यात शेफालीने फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. तिने अवघ्या २५ चेंडूंत ५५ धावांची आक्रमक खेळी साकारली. भारताने झिम्बाब्वेला २० षटकांत ८ बाद १०२ धावांवर रोखले आणि प्रत्युत्तरात केवळ ८.५ षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी होणार आहे.
