पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थ सेवनाचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासणीत दोन जणांची ड्रग्ज सेवनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये एका केनियन नागरिकासह एका भारतीय व्यक्तीचा समावेश आहे. २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीत दोसांझ यांच्या ‘ऑरा इंडिया टूर २०२६’ अंतर्गत या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवत अंमली पदार्थ सेवनाची तपासणी केली.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने या कार्यक्रमासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली. यावेळी सुमारे ४० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या व्यक्तींनी नेमके कोणते अंमली पदार्थ सेवन केले होते आणि त्यांना हे पदार्थ कुठून मिळाले, याची माहिती पोलीस मिळवत आहेत. या कारवाईसाठी पोलिसांनी नव्याने दाखल केलेल्या ‘अँटी-नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन’चा वापर केला. या वाहनामध्ये घटनास्थळीच प्राथमिक तपासणी आणि पुरावे संकलित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
हे ही वाचा:
दीड लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडले ‘राष्ट्रवंदनम’
विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप
झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू
म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ
विशेष म्हणजे, याच ठिकाणी २२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका संगीत कार्यक्रमातही पोलिसांनी तपासणी केली होती. त्यावेळी ५५ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १२ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुंबईतील मोठ्या संगीत कार्यक्रमांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तरुणांमध्ये अशा पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टपूर्वी कार्यक्रमस्थळी बॉम्बस्फोट आणि ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने पोलिसांनी सुरक्षेची विशेष व्यवस्था केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि साध्या वेशातील पोलिसांकडूनही परिसराची तपासणी करण्यात आली. एकीकडे सुरक्षेचे आव्हान आणि दुसरीकडे अंमली पदार्थ सेवनाच्या घटना समोर आल्याने मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षा व्यवस्थेसह ड्रग्जविरोधी कारवाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
